गेल्या 2-3 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून अनेक भागात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून टाकले असून शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक घरे, संसार उघड्यावर पडली आहेत. म्हणून अशा भागांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उद्यापासून मराठवाड्याच्या दौ-यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे येथे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत. हा दोन दिवसांचा पाहणीदौरा असणार आहे.
मराठवाड्याचा हा दोन दिवसांचा दौरा 18 आणि 19 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या दौ-यात शरद पवार तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून येथील जनतेशी संवाद साधतील. तसेच त्यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेत तेथील अधिका-यांशी चर्चा करतील. Maharashtra Rains Update: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; पाहा पाच महत्त्वाच्या बातम्या
राज्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. “राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहू नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा,” असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान सध्या निम्मा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे. आधीच कोरोना संकटामुळे खचलेल्या महाराष्ट्राला आता अतिवृष्टीने फटका बसला आहे. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister of Revenue Balasaheb Thorat) यांनी राज्य सरकारसोबत केंद्रानेही भरीव मदत करत शेतकर्यांच्या पाठीशी उभे रहावे अशी मागणी केली आहे.