'महागाई, बेरोजगारीच्या समस्या सोडवण्यात केंद्र सरकार ‘100 टक्के अपयशी’; सध्या 'अयोध्येला जाणे' हा राष्ट्रीय मुद्दा नाही'- Sharad Pawar यांची टीका
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी मंगळवारी सध्याच्या विविध मुद्द्यांवर भाष्य करत भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, ‘महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार ‘100 टक्के अपयशी’ ठरले आहे, मात्र काही लोकांची अयोध्या भेट आणि प्रार्थना जप यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे.’ कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘अयोध्येला जाणे हा राष्ट्रीय प्रश्न नाही’. ते पुढे म्हणाले की, केंद्राशी संलग्न असलेल्या लोकांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या धाडी पडत नाहीत, परंतु विरोधी पक्षांवर कारवाई केली जात आहे.

नरेंद्र मोदी सरकारने 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर जनतेला आश्वासने दिली होती. परंतु ते 100 टक्के अपयशी ठरले आहेत आणि लोक त्यांच्याकडून योग्य वेळी किंमत वसूल करतील, असा दावा पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘सर्वसामान्य माणूस या सर्व समस्यांना तोंड देत असताना, केंद्रात सत्तेत असलेले लोक या प्रश्नांकडे लक्ष देण्यास तयार नाहीत आणि या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी धर्माशी संबंधित गोष्टींना प्रोत्साहन दिले जात आहे,’

देशद्रोह कायद्यावर केंद्राने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या तरतुदींचा ‘सक्षम मंच’द्वारे पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत पवार म्हणाले की, त्यांनी कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर आधीच सांगितले आहे की हा कायदा ‘पुरातन’ आहे आणि ब्रिटिशांनी (तत्कालीन भारतातील सत्ताधारी) त्यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरुद्ध त्याचा वापर केला होता. आपण आता स्वतंत्र देश आहोत आणि प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही मुद्द्यावर आवाज उठवण्याचा अधिकार आहे.

भाजपच्या विरोधात पर्यायी आघाडी आणण्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, ‘या विषयावर चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाने अंतर्गत निर्णय घ्यावा. उदाहरणार्थ, काँग्रेसचे 'चिंतन' शिबिर सुरू आहे आणि मला वाटते की तेही काही निष्कर्ष काढतील. इतर पक्षही त्यावर चर्चा करत आहेत.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते ‘विरोधक चेहरा’ आहेत का?, असे विचारले असता पवार म्हणाले, ‘ते आताच सांगता येणार नाही. आम्ही एकत्र होतो, पण काँग्रेस आणि कम्युनिस्ट दुसऱ्या बाजूला होते. काँग्रेस, कम्युनिस्ट, ममता आणि आम्ही एकत्र असतो तर चित्र अजून वेगळे दिसले असते. केरळमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढते, पण कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत.’

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी पक्षांमध्ये युती होण्याच्या शक्यतेवर पवार म्हणाले- ‘या मुद्द्यावर पक्षात दोन मते आहेत. काही (राष्ट्रवादीच्या सदस्यांना) वाटते की आपण स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढली पाहिजे आणि निवडणुकीनंतर आपण एकत्र बसून (युतीचा) निर्णय घेऊ शकतो, परंतु काही लोक म्हणतात की आपण एकत्र सरकार चालवत असल्याने एकत्र निवडणुकांना सामोरे जावे. परंतु, या मुद्द्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.’ (हेही वाचा: भाजप खासदार Brij Bhushan Sharan Singh विरोधानंतरही मनसे Raj Thackeray च्या अयोद्धा दौर्‍यावर ठाम; 'ब्रिजभूषण सिंह म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नव्हे'- बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, अलीकडेच मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचे आवाहन करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले की, ते प्रभू रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही यापूर्वी आपण अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले होते.