भाजप खासदार Brij Bhushan Sharan Singh  विरोधानंतरही मनसे Raj Thackeray च्या अयोद्धा दौर्‍यावर ठाम; 'ब्रिजभूषण सिंह म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नव्हे'- बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया
Bala Nandgaonkar | (Photo Credits: Facebook)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा अयोद्धा दौरा (Ayodhya Visit) 5 जून दिवशी आयोजित आहे. पण सध्या त्यांच्या अयोद्धा दौर्‍याला उत्तर प्रदेशात भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याकडून विरोध केला जात आहे. आज त्यांनी राज ठाकरेंच्या अयोद्धा दौर्‍याला विरोध करण्यासाठी खास रॅलीचं आयोजन केले होते. दरम्यान महाराष्ट्रात आता मनसेच्या गोटातही या प्रखर विरोधानंतर बैठकांचे सत्र वाढले आहे. राज ठाकरेंनी आज पक्षाच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली आहे. बाळा नांदगावकरांनी या बैठकीनंतर मीडीयाला माहिती देताना आपण राज ठाकरेंच्या 5 जूनच्या अयोद्धा दौर्‍यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, तीव्र शब्दांत टीका .

दरम्यान राज ठाकरेंच्या अयोद्धा दौर्‍याची तयारी सुरू आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. अजून एक बैठक घेऊन पुढील व्यवस्था, आयोजन ठरवले जाणार आहे. असे बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केले आहे. तर भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणजे सारा उत्तर प्रदेश नव्हे असे म्हणत त्यांनी या विरोधाकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. सध्या उत्तर प्रदेश अयोद्धा मध्ये मनसेचं एक राजकीय कार्यालय सुरू झालं आहे. तेथून लोकं आम्हाला बोलावत आहेत असेही नांदगावकरांनी सांगितले आहे.

'असली नकली' वादग्रस्त पोस्टर वर मनसेची प्रतिक्रिया

शिवसेनेकडून रविवारी 'असली आ रहा है नकली से सावधान' असं पोस्टर लावत अप्रत्यक्षपणे मनसेवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना नांदगावकरांनी आज 'शिवसेनेला आपण असली आहोत हे सांगण्यासाठी पोस्टर लावावं लागत' यातच सारं आले' असं म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी प्रवक्त्यांशिवाय अन्य कोणीही अयोद्धा दौर्‍याबाबत बोलू नये अशी जाहीर तंबी दिली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून प्रखर टीका झाली तरीही मनसे कार्यकर्त्यांनी सध्या टोकाची भूमिका घेणं टाळल्याचं पहायला मिळालं आहे. नांदगावकरांनीही त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू अशी भूमिका घेणं टाळावं असं म्हटलं आहे.