Brij Bhushan Sharan Singh, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून तीव्र विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray) यांनी या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यारव तीव्र शब्दांत टीकाही केली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागीतल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशमध्ये घुसूही दिले जाणार नाही, अशी बृजभूषण (Brij Bhushan Singh) यांची भूमिका आहे. राज यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी त्यांनी नंदिनी येथे उत्तर प्रदेशातील साधुसंत आणि नागरिक यांच्याशी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आक्रमक हिंदुत्त्वाचे राजकारण सुरु केले आहे. राज्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यानंतर अचानक त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. येत्या 5 जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर निघणार आहेत. तत्पूर्वीच भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना विरोध दर्शवला आहे. आपल्या भूमिकेमुळे खासदार बृजभूषण सिंह सध्या जोरदार प्रसिद्धिच्या झोतात आहेत. एका बाजूला महाराष्ट्रात मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-मनसे युतीची दबक्या आवाजात चर्चा सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला बृजभूषण यांसारख्या मंडळींनी स्वपक्षालाच अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Raj Thackeray: खोट्या भावनेने जाणाऱ्यांना भगवान राम आशीर्वाद देत नाहीत, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला)

महाराष्ट्रातील भाजप नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षातील उत्तर प्रदेशमधील नेते मात्र राज यांना प्रचंड विरोध करत आहेत. त्यामुळे विरोधाभास मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर प्रदेशात

मंगळवारी मोठ्या रॅलीचं आयोजन केलं आहे. 'मला कोणताही मोठा नेता व्हायचे नाही. जे काही द्यायचे ते देवाने, जनेतेने आणि पक्षाने मला दिले आहे. मात्र, ज्यांनी उत्तर भारतीयांवर अन्याय केला ते कधीच येथे घुसू शकणार नाहीत. राज ठाकरे हे दबंग नव्हे तर उंदीर आहेत. पहिल्यांदाच ते बाहेर येत आहेत. त्यांनी माफी मागावी अन्यथा आयुष्यात ते कधीच उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड राज्यात येऊ शकणार नाहीत', असेही त्यांनी म्हटले आहे.