Sanjay Raut on Raj Thackeray: खोट्या भावनेने जाणाऱ्यांना भगवान राम आशीर्वाद देत नाहीत, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
Sanjay Raut, Raj Thackeray (PC - PTI)

Sanjay Raut on Raj Thackeray: महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वादातून शिवसेनेने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्या आगामी उत्तर प्रदेशातील अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले. संजय राऊत म्हणाले की, 'प्रभू राम त्यांच्याकडे बनावट भावना घेऊन आणि राजकीय कारणांसाठी येणाऱ्यांना आशीर्वाद देत नाहीत.

नुकतेच मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचे आवाहन करून वादात सापडलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात प्रभू रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते. (हेही वाचा - Kishori Pednekar On Navneet Rana: आम्हाला वाटले बबली मोठी झाली मात्र ती अजूनही मुर्ख आहे, किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर घणाघाती टीका)

संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा 10 जूनच्या आसपास प्रस्तावित आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिक येणार आहेत. हा आमच्यासाठी राजकारणाचा भाग नसून विश्वासाचा विषय असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजातील विविध घटकांनी आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वाचे खरे मर्म अधोरेखित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रभू राम खोट्या भावनेने आणि राजकीय कारणांसाठी त्यांच्याकडे जाणाऱ्यांना आशीर्वाद देत नाहीत. अशा लोकांना विरोधाचा सामना करावा लागतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराचा विरोध -

भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत उत्तर भारतीयांचा अपमान केल्याबद्दल राज ठाकरे जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय त्यांना शहरात येऊ देऊ नये, असा इशारा दिला आहे. सिंह यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय भेटू नये, अशी विनंती केली होती.