Buffalo Breeding: काय सांगता? म्हैस माजावर येत नाही? असा ओळखा म्हशीचा माज
Buffalo Breeding | (File Photo)

पशूपालन (Animal Husbandry) हा एक शेतीला परस्पर पूरक व्यवसाय. त्यामुळे आपल्यापैकी अनेक शेतकरी गाय, म्हैस (Buffalo) पालनास प्राधान्य देतात. पण, अनेकदा असे दिसते की, अनेक शेतकरी हे पशूपालन व्यावसायिक दृष्ट्या न पाहता तो पारंपरिक व्यवसाय म्हणून करतात. व्यावसायिक पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आजही प्रचंड प्रमाणात कमी आहे. व्यावसायिक दृष्टीकोन नसल्याने पारंपरीक पद्धीतीने पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा जानावरांच्या प्रजोत्पादनात अडचण येते. परिणामी दुग्धोत्पादन घटते. म्हैस पालन (buffalo Husbandry) करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनेकदा अशाच गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांना वाटते की आपली म्हैस माजावर येत नाही. किंवा अनेक शेतकऱ्यांना म्हैशीचा माज ओळखताच येत नाही. आज आम्ही म्हैशीचा माज कसा ओळखावा याबाबत माहिती देत आहोत.

म्हैशीच्या माजाची लक्षणे

म्हैशीचा माज ओळखताना प्रथम त्याची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. अनेकदा म्हैस मुका माज करते. मुका माज म्हणजे म्हशीच्या माजाची लक्षणे न दिसणे. त्यामुळे म्हशीच्या माजाची लक्षणे प्रथम समजून घ्यायला हवीत. (हेही वाचा, भिलवडी: कृत्रिम रेतनातून म्हैशीला रेडकू; जगातील पहिलाच प्रयोग)

 • माजावर आलेल्या म्हैस/म्हशी विशिष्ट प्रकारच्या आवाजात हंबरतात.
 • माजावर आलेली म्हैस थोड्या थोड्या वेळाने लघवी (मूत्रविसर्जन) करते.
 • काही म्हशींच्या योनीतून पांढऱ्या रंगाचा पातळ स्त्राव स्त्रवतो. याला ग्रामीण भागात म्हैस बळसणे असेही म्हणतात.
 • बहुतांश वेळा म्हैस ही शक्यतो सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी माजावर येते.
 • अभ्यासक सांगतात की सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात म्हशी अधिक प्रमाणावर माजावर येतात.

म्हशीचा माज कसा ओळखाल?

 • आतापर्यंत तरी सर्वसाधारणपणे म्हशीच्या लक्षणांवरुनच म्हशीचा माज ओळखण्याची पद्धत रुढ आहे. शेतकऱ्याला परंपरेने आलेले ज्ञान आणि अनुभव असल्याने शक्यतो माज ओळखण्यात अडचण येत नाही.
 • काही शेतकरी पशूपालनाकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देतात. ते म्हशीबाबतचीची निरिक्षणे नोंद करुन ठेवतात. अशा वेळी नोंदींवरुन म्हैशीच्या माजाची तारीख बिनचूक काढणे सोपे जाते.
 • याला आणखीही एक सोपा पर्याय म्हणजे नसबंधी केलेला रेडा म्हैशीच्या कळपात सोडूनही माज तपासता येतो.
 • म्हशीच्या गोठ्यामध्ये अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करुनही माज ओळखता येतो. जसे की सीसीटीव्ही कॅमेरे लाऊन म्हशीचे वर्तन, लक्षणे तपासणे.
 • प्रगत देशात प्रशिक्षीत श्वानाचाही वापर म्हशीचा माज ओळखण्यासाठी केला जातो.
 • शिवाय व्हेटर्नरी डॉक्टर, अल्ट्रा सोनोग्राफी मशीन आदींचा वापर करुनही म्हशीचा माज ओळखता येतो.

म्हशीचा माज ओळखता येणे अतिशय महत्त्वाचे असते. ज्या शेतकऱ्याला म्हशीचा माज वेळेवर ओळखता येतो तो शेतकरी त्या म्हैशीपासून अधिकाधिक उत्पन्न मिळवू शकतो. मैशीचा माज वेळीच ओळखून तिचा जातीवंत रेड्यासोबत समागम घडवून आणल्यास होणारी पैदास सुदृढ आणि निकोप होते. म्हशीच्या दूधावरही त्याचा मोठा परिणाम होतो.