बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) डेंग्यू (Dengue) सारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये अचानक वाढ होत असल्याने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामध्ये 'भाग मच्छर भाग' (Bhag Machchar Bhag) या विशेष मोहीमेचा समावेश आहे. ही मोहीम डास नियंत्रण (BMC Mosquito Control Campaign) उपायांबद्दल जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यातआली आहे. BMC च्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या मान्सून अहवालानुसार, शहरात जून 2024 च्या तुलनेत जुलैच्या पहिल्या सहामाहीत डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) आणि H1N1 च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विविध उपाययोजनांद्वारे रुग्ण संख्या आणि आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याचा महापालिकेचा मानस आहे.
डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईमध्ये व्हायरल आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जूनमधील डेंग्यूची 93 प्रकरणे होती, त्यात वाढ झाली असून, 1 ते 15 जुलै दरम्यान 165 रुग्णांची नोंद झाली आहे. लेप्टोस्पायरोसिसची प्रकरणे जूनमधील 28 वरून जुलैच्या पहिल्या सहामाहीत 52 पर्यंत वाढली आहेत. त्याचप्रमाणे H1N1फ्लूचे रुग्ण जूनमधील 10 वरून त्याच कालावधीत 53 वर पोहोचले आहेत. (हेही वाचा, Mumbai Monsoon Viral Illnesses Increase: मुंबईमध्ये Dengue, H1N1, Leptospirosis रुग्णांमध्ये वाढ; 'पावसाळ्यात काळजी घ्या' BMC चे नागरिकांना अवाहन)
‘भाग मच्छर भाग’ मोहीम
आजारांचे वाढते प्रमाण पाहता, प्रतिसाद म्हणून बीएमसीने ‘भाग मच्छर भाग’ मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तींच्या लघुपट आणि संदेशांद्वारे डास नियंत्रण उपायांना प्रोत्साहन देते. दरम्यान, BMC ने नागरिकांनाही डासांची उत्पत्ती ठिकाणे दूर करण्यासाठी, मच्छरदाणी वापरण्यासाठी आणि संरक्षणात्मक कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा, Reduce the Risk of Dengue During Monsoon: पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या डेंग्यू आजाराचा धोका कसा कमी करावा?)
ग्लेनिगल्स हॉस्पिटल, परळ येथील अंतर्गत औषधाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल, यांनी म्हटले आहे की, गेल्या आठवड्यापासून दररोज 5-6 डेंग्यू आणि H1N1 प्रकरणे दिसत आहेत. त्यांनी लसीकरणाच्या महत्त्वावर जोर दिला आणि म्हटले की, “H1N1 आणि न्यूमोनिया या दोन्हींसाठी लस उपलब्ध आहेत. या लसी घेतल्याने या आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल. म्हणजे उच्च दर्जाचा ताप, अंगदुखी आणि थंडी वाजून येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. ती दिसली की त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांनी, ज्यांना मधुमेह आणि इतर कॉमोरबिडीटी आहेत, त्यांनी न्यूमोनियाची लस घेण्याची गरज, असल्याचेही त्या म्हणाल्या.
पीडी हिंदुजा हॉस्पिटल, माहीम येथील संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. उमंग अग्रवाल यांनीही आठवड्यात H1N1 आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले, आमच्याकडे 18 वर्षांची मुले आणि 82 वर्षांचे नागरिक अशी विविध वयोगटातील रुग्ण आमच्याकडे आले आहेत. ज्यांना फ्लूची बाधा झाली आहे. कोविड-19 आणि इन्फ्लूएन्झा असलेल्या लोकांचीही प्रकरणे आढळली आहेत,” ते म्हणाले. त्यांनी नमूद केले की वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो, कधी कधी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागते.
डॉ. उमंग यांनी पुढे म्हटले की, लसीकरणाव्यतिरिक्त सामाजिक अंतर, मास्क घालणे, योग्य स्वच्छता पाळणे आणि घराजवळ पाणी साचणार नाही याची काळजी घेणे यासारखी खबरदारी घेणे आवश्यक आहे.