शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा
शिवस्मारक (Representative and file images)

अरबी समुद्रातील नियोजित शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या (Shiv Smarak) निविदा प्रक्रियेत भाजप सरकारने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली होती. परंतु, हा आरोप माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फेटाळून लावला आहे. 'अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या निविदेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा अनियमितता नाही. यासंदर्भाचील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,' असा दावा पाटील यांनी आज नागपूरमध्ये केला आहे. (हेही वाचा - शिवस्मारकाच्या कामात भाजपकडून 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा, केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार- राष्ट्रवादी कॉंग्रेस)

शिवस्मारकाच्या निविदांसंदर्भात केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून 'एल अॅण्ड टी' कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला होता. परंतु, हा आरोप खोटा असल्याचं भाजपने सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज नागपूर येथे हे आरोप धुडकावून देताना सांगितले की, 'शिवस्मारकाच्या कामाचे 3800 कोटींचे टेंडर 2500 कोटींवर आले आहे. या टेंडरच्या पैशाचे पेमेंटदेखील करण्यात आले नाही. त्यामुळे यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. या प्रकरणातील चौकशीसाठी आम्ही तयार आहोत. या प्रकरणाची चौकशी लवकर चालू करा,' असा खोचक टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाकडून अरबी समुद्रामधील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा असल्याचा आरोप

मुंबईत गिरगांव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात येणार आहे. येथील खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. ही जागा गिरगांव चौपाटीपासून 3.6 किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून 2.6 किमी अंतरावर तसेच राजभवनपासून 1.2 किमी अंतरावर आहे.