शिवस्मारकाच्या कामात भाजपकडून 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा, केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार- राष्ट्रवादी कॉंग्रेस
शिवस्मारक (Representative and file images)

मान्यता मिळाल्यापासूनच अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा (Shiv Smarak) मुद्दा मोठ्या चर्चेत आहे. आत या शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भाजपकडून (BJP) तब्बल 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसने (Congress) केला आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची संयुक्त पत्रकार परिषद काल पडली. या परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. यामध्ये फक्त अधिकारीच नाही तर बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील आणि मुख्यमंत्री यांचाही समावेश असल्याचे विरोधी पक्षांच्या म्हणणे आहे.

शिवस्मारक बांधण्याचे कंत्राट देताना केंद्रीय दक्षता आयोगाचे नियम धुडकावून लावले. या प्रकल्पासाठी 2,692 कोटी रुपयांची निविदा ठरवण्यात आली होती. मात्र ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले, त्यांची बोली ही 3,826 कोटी इतकी होती. कंपनीला हे कंत्राट देता यावे यासाठी मूळ पुतळ्याची उंची कमी करण्यात आली. स्मारकाचा मूळ आराखडा बदलून निवेदेतील रक्कम 1 हजार कोटी रुपयांनी कमी केली गेली. याच 1 हजाराचा भ्रष्टाचार झाला असल्याचे एनसीपी आणि कॉंग्रेसचे म्हणणे आहे. (हेही वाचा: काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाकडून अरबी समुद्रामधील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा असल्याचा आरोप)

याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे, आयोगाने लक्ष न घातल्यास न्यायालयात धाव घेऊ अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान या आरोपांचे खंडन करताना, कंत्राटदार एल अँड टी यांना आजपावेतो कोणतीही रक्कम दिली गेली नाही. कितीही प्रयत्न करा शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार आढळणार नाही असा टोला चंद्रकात पाटील यांनी लावला आहे.