BJP Opposes Ban On PoP For Ganesh Idols: भाजपचा गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीच्या वापरावरील निर्बंधाला विरोध; इतर पर्याय शोधण्याची विनंती, घेतली Devendra Fadnavis यांची भेट
Lord Ganesh (PC - Twitter)

BJP Opposes Ban On POP For Ganesh Idols: यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) सुरुवात होत आहे. त्याआधी गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीबाबत वाद उद्भवला आहे. आगामी उत्सवासाठी गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) वापरावरील 'अंदाधुंद निर्बंध' ला भाजपच्या शहर युनिटने विरोध केला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मूर्ती तयार करण्यासाठी पर्यायी कच्चा माल न शोधता पीओपीच्या वापरावर निर्बंध आणण्यास विरोध केला.

शेलार यांनी फडणवीस यांना सांगितले की, 'शाडू' माती (जी पर्यावरणपूरक आहे) वापरण्यास हरकत नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पीओपीच्या वापरावर अंदाधुंद बंदी घातल्याने मूर्तीकारांवर विपरित परिणाम होईल. यातील अनेक लोक बेरोजगार राहण्याची शक्यता आहे आणि प्रचंड मागणी असणाऱ्या मुर्त्यांची उपलब्धतता कमी होईल.

शेलार पुढे म्हणाले, ‘मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या उद्योगाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि त्याच वेळी मूर्तींची मागणी देखील पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी एक व्यवहार्य उपाय शोधणे आवश्यक आहे.’ सण अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून अशा वेळी त्यावर पीओपीवर बंदी आणल्यास मूर्तीनिर्मिती उद्योगाला मोठा फटका बसेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (हेही वाचा: Narsing Udgirkar: वंचितच्या पराभूत उमेदवाराने एकाच दिवशी बुक केल्या आलिशान Range Rover आणि Toyota Fortuner; किंमत फक्त 4 कोटी)

ते म्हणाले की, लाखो लोक या उद्योगावर अवलंबून आहेत. पीओपीच्या वापरावरील कोणत्याही निर्बंधाचा या उद्योगावर वाईट परिणाम होईल. भाजपला पर्यावरणाच्या प्रश्नांइतकीच याचीही काळजी आहे. कोणताही निर्णय घेताना लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचाही विचार करावा लागतो. पीओपीवर पूर्णपणे बंदी घातली तर त्याचा आर्थिक बाबींवर परिणाम होईल. गणेशोत्सवादरम्यान मूर्ती उपलब्ध होणार नाहीत. या प्रश्नाबाबत शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांना व्यवहार्य तोडगा काढण्याची विनंती केली, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि व्यवसायावरही परिणाम होणार नाही. अखिल सार्वजनिक गणेशोत्सव समिती (महाराष्ट्र) चे सदस्य शिष्टमंडळाचा एक भाग होते. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि आजूबाजूचा परिसर हा गणेशमूर्ती निर्मात्यांचे केंद्र मानला जातो. इथे अगदी सहा इंच ते 12 फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती बनवण्याचे काम घराघरांत वर्षभर चालते.