File Image of NCP chief Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरत संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चोंना उधाण आलं. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत त्यांना पाठिंबा दर्शवणारी पोस्टर लावण्यात आली आहेत. या पोस्टरवर 'आम्ही 80 वर्षाच्या योध्यासोबत!', समस्त बारामतीकर, असं लिहलं आहे. तसेच आज सकाळी शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या आमदारांनीही आपला शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा - Mahrashtra Government Formation Live Updates: क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हे कळलंच असेल- नितीन गडकरी)

सध्या शरद पवार मुंबईमध्ये आहेत. बारामतीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षात परत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच अजित पवार यांनी मला सध्या काहीही बोलायचं नाही. मी वेळ आल्यावर भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री शपथविधी होता की दशक्रियाविधी? संजय राऊत यांचा उपरोधिक सवाल

आज सकाळी पार पडलेल्या शपथविधीस अजित पवार यांना राष्ट्रवादीतील 22 आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अद्याप त्यांना नेमकी किती आमदारांचा पाठींबा आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. उलटपक्षी जे आमदार शपथविधीसाठी उपस्थित होते त्यांनी शरद पवारांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याची खात्री व्यक्त केली आहे. ते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी बहुमत सिद्ध करून दाखवावे. सकाळी अजित पवार यांच्यासोबत 8 आमदार होते. त्यापैकी 5 आमदार राष्ट्रवादीत परत आले आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.