
बाळ केशव ठाकरे (Bal Keshav Thackeray) यांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते पक्षप्रमुख असा प्रवास करणार्या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर आपला करिष्मा तयार केला. यंदा त्यांची दहावी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 दिवशी वृद्धापकाळाने त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता. आज बाळ ठाकरेंच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे काही क्वचित पाहिले गेलेले फोटोज आणि त्यामागील आठवणींचा कोलाज थोडा उलगडून पहा.
आज शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. बाळासाहेब हयात असताना देखील शिवसेना अनेकदा फूटीच्या उंबरठ्यावर उभी होती. 1970 मध्ये बंडू शिंगरे यांनी देखील बाळासाहेबांसमोर प्रति शिवसेना उभं करण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही काळातच निष्कळ ठरला आणि बाळासाहेबांनी पुन्हा शिवसेनेची मूठ बांधली होती. नंतर छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे यांची सोडचिठ्ठी पक्षाला मोठा धक्का होता. पण काळानुरूप शिवसेनेमध्येही बदल होत गेले.

बाळ केशव ठाकरे हे प्रबोधकार ठाकरे यांचे चिरंजीव आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे बंधू होते. त्यांनी सरला वैद्य यांच्यासोबत विवाह केला. बाळ ठाकरे पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झाले आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांच्या 'मां' साहेब झाल्या.

शिवसेना पक्षाची स्थापना करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे हे फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. आपल्या फटकार्यांनी ते राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढत होते. याचे पडसाद पाहता बाळ ठाकरेंनी दादर मध्ये 'शिवसेना' पक्षाचा नारळ फोडला. 19 जून 1966 साली शिवसेना पक्ष अस्तित्त्वात आला.

बाळासाहेब ठाकरेंना 3 अपत्यं. सर्वात मोठे बिंधुमाधव ठाकरे त्यानंतर जयदेव ठाकरे आणि सर्वात लहान उद्धव ठाकरे. बाळासाहेबांच्या तिन्ही मुलांची कलाक्षेत्राशी निगडीत शिक्षण घेत आपली आवड-निवड जोपासली. उद्धव ठाकरेंकडे मात्र त्यांनी पक्षाची जबाबदारी सोपावली.

बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या तिन्ही मुलांइतका त्यांचे पुतणे राज ठाकरे देखील प्रिय होते. राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर बाळासाहेबांचा प्रभाव आजही दिसून येतो. पण शिवसेनेसोबत काही मतभेद आणि मनभेद झाल्याने शिवसेनेपासून ते दूर झाले आणि त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला.

हिंदुत्त्वाचा धागा पकडत भाजपासोबत 1984 मध्ये शिवसेनेने युती करण्यापूर्वी 1979 मध्ये त्यांनी मुस्लिम लीग सोबतची युती केली होती. नया नगरमध्ये बनटवाला आणि ठाकरे एकत्र आले होते. मुस्लीम लीगच्याच पाठिब्यवर एकेकाळी शिवसेनेने आपला महापौर बनवला होता. नक्की वाचा: Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे: भूमिका आणि निर्माण झालेले वाद

Balasaheb Thackeray | Instagram/
90 व्या दशकापासून भारतामध्ये हिंदुत्त्वाचं राजकारण सुरू झालं. शिवसेनेने तेव्हा भाजपाची साथ दिली. 92ची दंगल, अयोद्धा प्रकरण, बाबरी मस्जिदचा मुद्दा यामध्ये बाळासाहेबांनी पुढाकार घेत शिवसेनेची भक्कम भूमिका घेतली. आजही 'रघुकूल रीत सदा चली आए प्राण जाए पण वचन न जाए' हेच हिंदुत्त्व शिवसेना जोपासत असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातं.

राजकारणासोबतच बाळ ठाकरे कलाक्षेत्रातही रमले. शिव उद्योग सेनेला आर्थिक बळ देण्यासाठी आणि तरूणाईच्या गळ्यातला तेव्हा ताईत असणारा पॉप स्टार मायकल जॅक्सन याला 1996 साली भारतामध्ये आमंत्रित केले होते. यावेळी मायकल जॅक्सन 'मातोश्री' वर देखील आले होते.

शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामान्य मराठी घरातील लोकांना बाळासाहेबांच्या सत्तेवर बसवले होते. यामध्ये छगन भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी ते अगदी नारायण राणे यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.
आज शिवसेनेमध्ये फूट पडल्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आपली वाटचाल पुढे करत आहे. सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यासाठी न्यायलयामध्ये लढाई सुरू आहे.