महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, एक कुशल राजकारणी, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ता अशी अनेक बिरुदे मिरवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल मराठी माणसाच्या मनात खास जागा आहे. हिंदू हृदयसम्राट बाळ केशव ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी, तर मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 साली झाला. आज गुरुवारी, बाळासाहेबांचा 10 वा स्मृतिदिन (Balasaheb Thackeray 10th Death Anniversary). बाळासाहेबांचे आयुष्य खूप रंजक राहिले आहे. एक व्यंगचित्रकार म्हणून काम करत असलेल्या बाळासाहेबांनी हिंदुत्व विचारधारेचा पक्ष काढला व आज त्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.
बाळ ठाकरे यांचा जीवन प्रवास व्यंगचित्रकार म्हणून सुरू झाला. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रापासून त्यांनी सुरुवात केली. यानंतर 1960 मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत मार्मिक नावाचे साप्ताहिक काढले. पुढे मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय-अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. एक नारळ फोडून शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. त्यांचे वडील प्रबोधन ठाकरे यांनी पक्षाचे नाव शिवसेना ठेवले.
पक्षाच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी बाळासाहेबांनी मार्मिकमधून दसऱ्याला शिवाजी पार्कवर पहिला मेळावा होणार असल्याची घोषणा केली. मराठी माणसाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली होती. महाराष्ट्रातील इतर शहरांच्या वाढत्या परप्रांतीय वर्चस्वात ठाकरे हे मराठ्यांसाठी मसिहा बनले. म्हणूनच शिवसेनेच्या पहिल्याच सभेला एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली की शिवाजी मैदान छोटे पडले.
पुढेही शिवाजी पार्कासह इतर अनेक ठिकाणी बाळासाहेबांनी भाषणे केली व ती प्रचंड गाजली. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाहूया त्यांची काही खास भाषणे.
दरम्यान, महाराष्ट्रातील मराठी तरुणांना नोकऱ्यांपासून ते इतर सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून बाळासाहेबांनी जो लढा त्यामुळे, 1990 पर्यंत शिवसेनेने महाराष्ट्रात चांगली पकड निर्माण केली होते. 1995 साली भाजप-शिवसेना युती होऊन महाराष्ट्रात नवे सरकारही आले. बाळासाहेबांना हवे असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब नेहमीच किंगमेकरच्याच भूमिकेत राहिले.
बाळासाहेबांना 25 जुलै 2012 रोजी श्वासोच्छ्वासाचा त्रासासाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटल दाखल करण्यात आले. 14 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांची तब्येत खालावली. शेवटी 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना राज्य सन्मानाने निरोप देण्यात आला. त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. (हेही वाचा: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे: भूमिका आणि निर्माण झालेले वाद)
बाळासाहेब पहिल्यांदा मुंबईत शक्तीशाली झाले आणि नंतर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये पसरले. त्यांचा दरारा इतका मोठा होता की, जेव्हा बाळासाहेब ठाकरे बंदची हाक देत असत, तेव्हा शहरात एक पानही हलत नसे. कोणत्याही स्थानिक राजकारणी नेत्याची इतकी ताकद आजवर या महाराष्ट्राने पाहिली नाही.