Hasan Mushrif | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रातील यापूर्वी मुदत संपलेल्या आणि डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी आरक्षित होते. त्याचं प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या घटकावर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्राद्वारे सांगितले आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत यापूर्वी मुदत संपलेल्या ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत, अशा अधिकाऱ्यांची कोरोनाच्या कामांसाठी आवश्यकता असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन त्या ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तिची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. (हेही वाचा - Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,390 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 96,253 वर)

कोरोना संकटामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या 13 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुदत संपणाऱ्या व यापूर्वी मुदत संपलेल्या आणि सद्यस्थितीत ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत, अशा ग्रामपंचायतीवर सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नियुक्त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करावयाच्या आहेत, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर संबंधित अध्यादेशान्वये प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.