Air Pollution (PC - ANI)

Air Pollution Crisis: वाढते वायूप्रदूषण आणि खालावलेली हवेची गुणवत्ता यांमुळे मुंबई (Mumbai Air Pollution) आणि दिल्ली (Delhi Air Pollution)येथील नागरिकांचा श्वास घुसमटतो आहे. सततच्या वायूप्रदूषणाला वैतागलेले नागरिक ही शहरं सोडण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. ही इच्छा व्यक्त करणाऱ्या नागरिकांची संख्याही तितकीच मोठी असल्याचे एका नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. प्रिस्टिन केअर या आरोग्य सेवा संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये जवळपास 4,000 सहभागींचा समावेश होता. हे सर्वजण मुंबई, दिल्ली शहर किंवा त्याच्या आसपासच्या प्रदेशातील होते. यामध्ये पुढे आले की, दोन्ही शहरांतील जवळपास 60% रहिवासी दोन्ही महानगरांमधील वायू प्रदूषणाच्या संकटामुळे इतर शहरांमध्ये स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत.

नागरिकांना श्वसनविकारांशी संबंधित लक्षणे

प्रिस्टिन केअरच्या सर्वेक्षणामध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार, तब्बल 90% प्रतिसादकर्त्यांनी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) शी संबंधित लक्षणे, जसे की सतत खोकला, धाप लागणे, घरघर येणे, घसा खवखवणे, आणि डोळे चिडचिडणे किंवा पाणचट होणे असे आढळून आल्याचे नोंदवले. 40% सहभागींनी दरवर्षी किंवा किमान दर काही वर्षांनी वायू प्रदूषण-संबंधित आरोग्यविषयक समस्यांसाठी वैद्यकीय मदत मागितल्याचेही या निष्कर्षांनुसार दिसून आले. 40% लोकांनी हिवाळ्याच्या हंगामात अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या पूर्व-अस्तित्वातील परिस्थिती बिघडत असल्याचे नमूद केले आहे. सर्वेक्षणात श्वासोच्छवासाच्या स्थितीवर हवेच्या गुणवत्तेच्या प्रभावावर विशेष तक्रारी प्राप्त झाल्या. (हेही वाचा, Pune Air Pollution: दिल्लीला नावे काय ठेवता? मुंबई पाठपोपाठ पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुद्धा खालावली, घ्या जाणून)

नागरिकांनी बंद केला सकाळचा व्यायाम आणि फिरणे

हवेच्या गुणवत्तेच्या परिस्थितीशी जुळवून घेताना, 35% प्रतिसादकर्त्यांनी व्यायाम आणि धावणे यासारख्या बाह्य कृती बंद केल्याचे सांगितले. तर 30% लोकांनी घराबाहेर असताना मास्क घालणे सुरू केल्याचे म्हटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फक्त 27% लोकांनी एअर प्युरिफायर वापरल्याचे मान्य केले आणि 43% लोकांनी एअर प्युरिफायर वापरल्याने प्रतिकारशक्ती कमी असे धक्कादायक मत व्यक्त केले. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

दिल्लीतील सध्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत येतो. तथापि, एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) स्टेज 3 निर्बंध उठवल्यामुळे अलीकडील दिलासा मिळाला. ज्यात बांधकामांची स्थिती, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (NCR) च्या निवडक भागात खाजगी BS3 आणि BS4 चारचाकी वाहनांच्या संचालनावरील बंदी समाविष्ट आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय प्रभावित झाला आहे. CAQM च्या अंदाजानुसार दिल्लीची हवेची गुणवत्ता आगामी काळात 'गंभीर' श्रेणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही.