भौगोलिक फायदा आणि अनुकूल हवामान असूनही, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujrat) या पश्चिमेकडील राज्यांमध्ये वायू प्रदूषण (Air Pollution) हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) च्या प्रादेशिक वायु प्रदूषण पातळीच्या नवीन विश्लेषणामध्ये हे दिसून आले आहे. CSE च्या कार्यकारी संचालक (संशोधन) अनुमिता रॉयचौधरी यांनी सांगितले की, 2019 ते 2021 दरम्यान मुंबईतील खराब हवेच्या दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे, तर चांगल्या हवेची संख्या 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. या भागातील परिस्थिती अजून चिघळू नये यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
समुद्राचे सान्निध्य आणि सुधारित वायुवीजनामुळे पश्चिमेकडील प्रदेशात हिवाळ्यातील प्रदूषणाची पातळी इंडो-गंगेच्या मैदानाइतकी नसली तर, ती वाढली आहे. मुंबईमधील वाढणारे वायू प्रदूषण हे हिवाळ्यापुरते मर्यादित नाही तर ती आता ती वर्षभराची समस्या झाली आहे.
विश्लेषणामध्ये दोन राज्यांमधील 15 शहरांमध्ये पसरलेले 56 कंटिन्युअस अॅम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स (CAAQMS) समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, कल्याण, नागपूर, नाशिक आणि सोलापूर येथे प्रत्येकी एक, चंद्रपूरमध्ये दोन, नवी मुंबईत चार, पुण्यात आठ आणि मुंबईत 21 स्थानके आहेत. गुजरातमधील अंकलेश्वर, नंदेसरी, वापी आणि वाटवा येथे प्रत्येकी एक, गांधीनगरमध्ये चार आणि अहमदाबादमधील आठ स्थानके आहेत.
संशोधकांना असे आढळून आले की, या प्रदेशातील जवळपास सर्व शहरांमध्ये 2020 मध्ये वार्षिक सरासरी पीएम 2.5 पातळीत घट झाली आहे, ज्या वर्षी लॉकडाऊन लागू झाला होता. मात्र आता पुन्हा आधीची परिस्थिती दिसून येत आहे. गुजरातमधील शहरे महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रदूषित आहेत. वाटवा आणि अंकलेश्वर या प्रदेशात 2021 ची सरासरी PM 2.5 ची 67 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेली सर्वाधिक प्रदूषित हवा आहे. त्यापाठोपाठ वापी आणि अहमदाबादचा 2021 साठी अनुक्रमे वार्षिक सरासरी 54 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आणि 53 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे.