अभिजित बिचुकले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी तयारीत; दोन दिवसात राज्यपालांकडे करणार सत्तास्थापनेचा दावा
Abhijit Bichukle For Maharashtra Chief Minister (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात सत्ता संघर्ष (Mahrashtra Government Formation)  शिगेला पोहचला असताना सर्वाधिक मते मिळवणाऱ्या भाजपाने (BJP)  या चढाओढीतून काढता पाय घेतला आहे. दुसरीकडे शिवसेनेने (Shivsena) सुद्धा अजूनही महाआघाडी सोबत जाण्याचा अधिकृत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. एकूणच काय तर विधानसभा निवडणूक उलटून दोन आठवडे होऊनही अद्याप सत्तास्थापने बाबत राज्यात अस्थिरता पाहायला मिळतेय. अशातच आता बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी आपणच मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यापूर्वी बिग बॉसच्या शो मध्ये देखील त्यांनी स्वतःच स्वतःला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्ह्णून घोषित केले होते पण यावेळेस हे प्रकरण चांगलेच गंभीर दिसत असून बिचूकलेंनी तर जनतेचा पाठिंबा मागणारे एक पत्र सुद्धा लिहिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदारसंघातून नोटा पेक्षाही कमी मते मिळवत बिचुकले यांचा पराभव झाला होता. तरीही आपल्याला महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिल्यास दोन दिवसातच राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी दावा करणार असल्याचे बिचुकले यांनी पत्रात म्हंटले आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून यावर नेटकरी सुद्धा "आता हाच पर्यय शिल्लक आहे" असे म्हणत खिल्ली उडवत आहेत.

समरसिंह मंत्री-पाटील हे मुख्यमंत्री बनले तर 'हे' नवे बदल होतील... वाचा सविस्तर

काय म्हणतायत अभिजित बिचुकले..

" 'मी स्वत: गेली 20 वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणांस माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरून 2004 , 2009 , 2014 आणि 2019 अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपतीपद मिळावे यासाठी देखील प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरू, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत;चे कसे आणि किती वेळा भले करून घेतले आहे हे तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्याबरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे'". 

Abhijit Bichukle Letter (Photo Credits: Sources)

दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता सत्तास्थापनेच्या संघर्षातून सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपने माघार घेतली आहे, याबाबत अधिकृत माहिती चंद्रकांत पाटील यांनी माध्यांना दिली असून जर का शिवसेना अन्य पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करू इच्छित असेल तर विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुद्धा भाजपने दर्शवली आहे. यामध्ये आता शिवसेनेची भूमिका काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.