शिवसेना (Shivsena) पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनाचे (Dainik Saamana) कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) काम सांभाळतात. तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या यादीत संजय राऊत यांचं नाव हमखास घेतलं जातं. तसेच शिवसेनेचे खासदार आणि दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची व पक्षाची भूमिका खंबीरपणे मांडणारा एक बुलंद आवाज म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते.
अशा या नेत्याची राजकारणात नक्की कशी एन्ट्री झाली ते आज आपण पाहणार आहोत.
त्यांच्या करिअरची सुरूवात झाली ती पत्रकारितेतून. लोकप्रभा या साप्ताहिकापासून ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला एकंदर प्रवास आहे.
बीबीसी मराठीने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या शब्दात संजय राऊत यांचा एकंदर प्रवास मंडल आहे. ते म्हणाले, "पहिल्यांदा राऊत हे 'लोकप्रभा' या साप्ताहिकात काम करायचे. तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) वाटत होतं. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले."
बीबीसी मराठीने ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांची देखील संजय राऊत यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दलची मते मंडळी, ती अशी "सुरुवातीला 'इंडियन एक्स्प्रेस'च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. नंतर लोकप्रभात क्राईम रिपोर्टर म्हणून रूजू झाले. त्यांची गुन्हेगारी विश्वातील पत्रकारितेवर चांगली पकड होती. सूत्रांकडून योग्य प्रकारे माहिती काढणं, बातमीचा माग काढणं आदी कामांमुळे त्यांचा समावेश उत्कृष्ट क्राईम रिपोर्टरमध्ये व्हायचा."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही: शिवसेना खासदार संजय राऊत
तसेच धवल कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना संजय राऊत यांच्याविषयी एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, "राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2005 मध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र संजय राऊत यांनी लिहिलं होतं. बाळासाहेबांना राऊत यांची शैली माहीत होती. राज यांचं राजीनामापत्र बाळासाहेबांच्या हातात पडताच त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं. संजय, हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते. नंतर राज ठाकरेंना समजवण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती."