Measles-Rubella Vaccination: गोवर - रुबेला या आजारांच समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 27 नोव्हेंबरपासून 9-15 वयोगटातील मुलांना गोवर रुबेला मोफत लसीकरणाच्या (Measles-Rubella Vaccination) मोहिमेला सुरुवात केली. मात्र पहिल्या दिवसांपासूनच मुलांना ऍलर्जिक रिऍक्शन आणि लसीकरणाशी निगडित अफवांमुळे सौम्य प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच सोलापूरमध्ये 41 शाळांनी गोवर -रुबेला लसीकरणाला नकार दिला आहे. या लसीकारणामुळे नपुसंकत्व (Impotence) येते असा समज येथील नागरिकांमध्ये आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 41 शाळांनी नपुसंकत्वाच्या भीतीने गोवर रुबेला लस मुलांना देणार नसल्याचे सांगितल्याने हा गैरसमज दूर करण्यासाठी सोलापूरचे आयुक्त शाळांच्या मुख्यध्यापकांसोबत तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे, मुंब्रा या भागात देखील अशाप्रकारच्या अफवांमुळे गोवर - रुबेला लसीकरणापासून दूर राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी देखील लसीकरणाच्या दुष्पपरिणामांच्या बातमीचे, शारीरिक दुर्बलता येत असल्याच्यागोष्टीचं खंडन केले आहे. गोवर रुबेला लसीकरण सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना लस द्यावी असे आवाहन केले आहे.
#गोवर_रुबेला प्रतिबंधासाठी राज्यभरात पहिल्या दिवशी १० लाख ७८ हजार बालकांचे लसीकरण ; पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणात सहभागी होण्याचे आरोग्यमंत्री @drdeepaksawant यांचे आवाहनhttps://t.co/qdxmJPPBKG pic.twitter.com/HOdiKCHnp6
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 28, 2018
गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राज्यभर मोफत सुरु करण्यात आली असली तरीही ती बंधनकारक नाही. तसेच राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्याना या लसीकरणानंतर अंगावर पुरळ येणं, खाज येणं अशा समस्या जाणवल्या आहेत. त्यामुळे काही भागातील नागरिक आणि विद्यार्थी धास्तावले आहेत.