बदलत्या हवामानाचा त्रास प्रत्येकालाच होत असतो. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात, छोटे मोठे आजार डोके वर काढतात. बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि खोकल्याची समस्या तर हमखास निर्माण होते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. त्यामुळे या काळात आरोग्याच्या बाबतीत जास्त दक्ष राहणे गरजेचे आहे. हवामान बदलत असताना व्हायरल इन्फेक्शनमुळे येणारा ताप मोठ्या प्रमाणावर आढळतो. या शिवाय घसा खराब होऊन येणारा खोकला, कावीळ, टायफॉइड, हे विकारही हवामान बदलत असताना जास्त पाहायला मिळतात. लहान मुले आणि वयस्क, वृद्ध मंडळी यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना हे आजार होण्याचा धोका जास्त असतो. अश्या वेळी हवामान बदलत असताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास आजार उद्भविण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होऊ शकतो. खाण्यापिण्याची योग्य प्रकारे काळजी घेणे, घराबाहेर पडताना काही गोष्टींचा अवलंब करणे यामुळे कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती वाढून अशा हवामानात तुम्ही हेल्दी राहू शकता.
* शरीराला रोगप्रतीरोधी बनवण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय आवश्यक आहे.’व्हिटॅमिन सी’युक्त पदार्थ सामान्य आजार जसे की, सर्दी, खोकला यांना लांब ठेवते आणि शरीराची प्रतिकार शक्तीदेखील वाढवते.
* बदलत्या हवामानात शक्यतो सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. मेथी, पालक आणि पुदीना हे काही चांगले पर्याय ठरू शकतात.
* दूध, दही आणि अंडी यांसोबतच मोड आलेल्या कडधान्यामधून शरीराला आवश्यक असणारी प्रथिने मिळतात.
* दिवसभरात भरपूर पाणी पीत रहा. पाणी शक्यतो उकळून गार केलेले असावे.
* लिंबू, संत्री , टोमॅटो अशा गोष्टी रोग प्रतिरोधक क्षमता वाढवतात. फळांचाही आहाराव समावेश असू द्या.
* आठवड्यातून 3-ते 5 दिवस न चुकता व्यायाम करा अथवा रनिंगला जा.
* बदलत्या हवामानात शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे घालूनच बाहेर पडावे.
* फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे. घरातील लहान मुले आणि वृध्द व्यक्ती यांना फ्रीजमधील एकदम थंड वस्तू खाण्यापासून परावृत्त करावे