आहारात नक्की कोणते तेल वापरावे? जाणून घ्या तेलाचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ बनवण्यासाठी थोड्या प्रमाणात तरी तेलाचा (Oil) वापर अनिर्वाय असतो. आपल्या तब्येतीबाबत थोडा तरी जागरूक असणारा मनुष्य नक्की कोणते खाद्यतेल वापरायचे? हा प्रश्न जरूर विचारतोच. तेलाचा वास जावा, नवा रंग प्राप्त व्हावा म्हणून प्रक्रिया केले जाते ते रिफाइंड तेल. वनस्पतींमधून निर्माण केल्या जाणाऱ्या तेलांना टिकाऊपणा विशेष नसतो. अशा तेलांना लवकर खवट वास येऊ लागतो म्हणून आहारात वापरता येत नाहीत. त्यांचा टिकाऊपणा वाढवा म्हणून त्यांच्यावरही प्रक्रिया केली जाते. बाजारात हल्ली शेंगदाणा, तिळ, मोहरी, सुर्यफूल, करडई, सोयाबिन, खोबरेल तेल अशी अनेक प्रकारची तेल उपलब्ध तर आहेत यातील नक्की कोणते तेल वापरावे? यासाठी जाणून घ्या तेलाचे महत्वाचे प्रकार आणि त्यांचे फायदे

> तीळ तेल – तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्‌स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्‌स् असतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. हे तेल पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.

> सूर्यफूल तेल – हे तेल आपल्या आहारात उपयुक्त ठरते. कारण यात ई जीवनसत्त्व असते. त्याचबरोबर मोनू ऍण्ड पॉली अनसॅच्युरेटेड फॅटस्चे योग्य प्रमाण असते. हे रिफाइंड किंवा नॉनरिफाइंड प्रकारचे वापरले तरी चालते. हे तेल हृदयास हितकर आहे.

> शेंगदाणा तेल - यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्‌स्‌चे उत्तम मिश्रण आहे. ते शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात.

> ऑलिव्ह ऑइल - हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. ऑलिव्ह ऑइल गरम केल्यामुळे त्यातील हेल्दी गुणधर्मात बदल होत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. हे तेल नियमीत वापरल्यास हृदयविकाराच्या त्रासापासून तुम्ही दूर राहू शकता. तसेच ऑईव्ह ऑइल वजन कमी करण्यास मदत करते, कॅन्सरचा धोका कमी करते.

> सोयाबीन तेल - सोयाबीनच्या द्विदल बियांपासून सुमारे 50 % खाद्य तेल काढता येते. यात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. रिफाइंड सोयाबीन तेलाचा खप शेंगदाण्याच्या तेलाच्या खालोखाल आहे.

> खोबरेल तेल – खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत. (हेही वाचा: नेहमी बाहेरचे खाणे? फूड पॉयझनिंग झाल्यास हे करा उपाय व अशी घ्या काळजी)

> राईचे तेल – हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो.

प्रत्येक तेलात विविध प्रमाणात फॅटी ऑसिडस् असल्यामुळे असे विशिष्ट आरोग्यदायी तेल कोणते हे सांगणे अशक्य आहे. कोणतेही एकच तेल वापरण्यापेक्षा स्वयंपाकासाठी विविध वेळी विविध तेलांचा वापर करणे हेच योग्य ठरेल. (सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)