दिवाळीनंतरच्या प्रदूषणापासून अशी घ्या शरीराची काळजी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : The Straits Times)

वायूप्रदूषणामुळे अस्थमा, श्वासाच्या समस्या, त्वचेच्या समस्या उद्भवतात. तसच हवेत असणारे हानिकारक घटक, केमिकल्स, धूर यांमुळे डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे अशा समस्यांदेखील तोंड द्यावे लागू शकते. जसे जसे प्रदूषण वाढते तसे तसे डोळे सुजणे, डोळे खांजवणे, अंधुक दिसणे यांसारख्या समस्यांही उद्भवतात. राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर प्रदूषणाचा स्तर अतिशय वाढला आहे. सध्या एखाद्या विषासारखी ही हवा लोकांच्या नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करत आहे, ज्यामुळे लोकांना श्वास घेणे अवघड होऊन बसले आहे. गुरुवारी दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे 15 ते 20 सिगारेट्स पिण्याइतके हानीकारक होते. अशा प्रदूषित हवेचा शरीरावर काय आणि कसा परिणाम होत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता, म्हणूनच आम्ही आज अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे वायू प्रदूषणाचा धोका काही प्रमाणात टाळता येऊ शकेल.

> सकाळी प्रदूषणाचा स्तर अधिक जास्त असतो, अशा परिस्थितीमध्ये घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळावे. तसेच सकाळी उठल्या उठल्या घराचे दरवाजे-खिडक्या उघडू नयेत.

> घरातून बाहेर पडताना डोळ्यांवर चष्मा लावूनच बाहेर पडा, ज्यामुळे हवेतील विषारी घटक डोळ्यांत प्रवेश करणार नाहीत.

> बाहेरून घरी परत आल्यावर लगेच डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच हातही साफ करूनच कोणत्याही अन्नपदार्थाला स्पर्श करा.

> डोळे साफ करण्यासाठी डॉक्टरांकडून दिल्या गेलेल्या आय ड्रॉपचा वापर करा.

> डोळ्यांत थोडे जरी इन्फेक्शन वाटत असेल तर लेन्सेस आणि मेकअपचा वापर अजिबात करू नका.

> डोळे जळजळत असतील तर थोडा वेळ डोळ्यांना थंड हवेच्या संपर्कात आणा.

> मोबाईल, संगणकाचा वापर जास्त कालावधीसाठी टाळा. संगणकावर काम करताना डोळे थंड पाण्याने धुवत राहा. यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत.

> ओमेगा 3एस आणि अँटीटॉक्सिडेंट घटक असलेल्या आन्नपदार्थांचा वापर आपल्या आहारात करा. उदा. मासे, हिरव्या पालेभाज्या, गाजर

> घरात शक्यतो उकळून गाळलेले पाणीच प्या.  डोळे थोडेसे जरी लाल दिसले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.