Diwali 2018 : दिवाळीच्या प्रदूषणापासून या घरगुती उपायांनी करा स्वतःचे संरक्षण
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons)

दिवाळी जसा दिव्यांचा, आकाशकंदिलाचा, फराळाचा, भेटवस्तूंचा सण आहे तसाच तो फटाक्यांचादेखील आहे. भलेही फटाके फोडणे हे हानिकारक आहे, आणि त्यावर उपाय म्हणून सरकारने फक्त दोनच तास फटाके फोडण्याची परवानगी दिली असली, तरी दिवाळीच्या वेळी वायुप्रदूषणापासून सुटका नाही. या वायुप्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  दिसताना अतिशय लहान दिसणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पुढे जाऊन नक्कीच त्या रौद्र रूप धारण करू शकतात. या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे उद्भवणारा खोकला, त्वचेच्या समस्या, श्वासाची समस्या अशा अनेक गोष्टींमुळे तुमचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या दिवाळीत तुमच्या आरोग्याला आयुर्वेदाची जोड देऊन; तुमच्या आजूबाजूची हवा स्वच्छ ठेऊन वायुप्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून आपल्या शरीराला वाचवू शकता. चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे ही दिवाळी आरोग्यमय जाईल.

कडुलिंब –

कडुलिंब हवेतील प्रदूषणाला शोषून घेतो. हवा शुद्ध करण्यासाठी आपल्या घरी कडूलिंबाच्या पानांचा एक गुच्छ ठेवा. लिंबाच्या पानांनी उकळलेल्या पाण्याने तुमचा चेहरा धुवा. शक्य असल्यास अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाका. लिंबाच्या पानांच्या सेवनाने तुमचे रक्त शुद्ध होते.

तुळस -

भारतातल्या प्रत्येक घरात तुळस आढळते. आयुर्वेदामध्ये तुळशीच्या पानांचे अनेक गुणकारी गुणधर्म आणि उपाय सांगितले आहेत. तुळशीच्या पानांचा रस दोन थेंब मधासोबत घेतल्याने श्वसनासंबंधी विकार नाहीसे होतात. तसेच तुळशीच्या पानांचा चहा घेतल्यास प्रदूषणामुळे होणाऱ्या खोकल्यास आराम मिळतो.

गुळ -

गुळाला उत्तम detox food मानले गेले आहे. प्रदूषणामुळे शरीरात गेलेल्या विषारी घटकांना बाहेर टाकण्याचे काम गुळ करते. त्यामुळे फक्त दिवाळीच्या वेळीच नाही तर इतर दिवशीही गुळाचे सेवन केले पाहिजे.  रक्त, फुफ्फुसे, श्वसनमार्ग, खाद्यानालिका यांमध्ये अडकलेले शरीराला घातक असणारे कण गुळामुळे शरीराबाहेर पडतात.

तूप -

प्रदूषणामुळे सर्दी झाल्यास नाकात तूप सोडावे, यामुळे नाक मोकळे होते. बरेचवेळा प्रदूषणामुळे हवेतील काही विषारी घटक पोटात जातात अशावेळी, साजूक तूप खाल्ल्याने पोटातील व्रण (अल्सर) बरे होतात. तसेच पोटात आग होत असल्यास साजूक तुपाचा फायदा होतो.

हळद -

हळद घातलेले दुध प्यायल्याने त्वचेची खाज, इंफेक्शन या सारख्या बऱ्याच समस्या दूर होतात. हवेतील प्रदूषणामुळे घश्यासंदर्भात काही समस्या उद्भवल्यास, हळद आणि गूळ यांच्या गोळ्या करून झोपताना घ्याव्यात आणि कोमट पाणी प्यावे यामुळे घशाला आराम मिळतो, खोकला कमी होऊन खोकल्याची ढास कमी होते.

कोरफड -

रोजच्या वापरात कोरफडीचा खूप फायदा होतो. केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड अतिशय उपयोगी आहे. दिवाळीच्यावेळी कोरफडीचे विशेष महत्व आहे.  फटक्यांमुळे त्वचेचे काही विकार झाले अथवा फटक्यांमुळे त्वचा भाजल्यास कोरफडीच्या गर त्या जागेवर लावल्याचे आराम मिळतो. कोरफडीचा गर थंड असल्याने भाजलेल्या जागेची तीव्रता कमी होऊन आराम मिळतो