Bhagirath Waterfall (Photo Credits: File Photo)

पावसाळा सुरु झाला की, पावसाची खरी मजा अनुभवण्यासाठी तमाम पिकनिक लव्हर्सची पावलं वळतात ती धबधब्यांकडे. तसे महाराष्ट्रात बरेच प्रसिद्ध धबधबे आहेत. मात्र कॉलेज विद्यार्थी ब-याचदा लेक्चर बंक करुन वनडे पिकनिक प्लान करतात. अशा वेळी ते मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यांची निवड करतात. किंवा अनेकदा आपल्या मुंबईबाहेर जास्त दूरचा प्रवास करणे शक्य नसते अशा वेळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धबधब्यांचा आपण पर्याय म्हणून विचार करतो.

तसे कर्जत, बदलापूर, भिवपूरी, पळसदरी येथे बरेच धबधबे आहेत. असाच एक भन्नाट धबधबा आहे तो म्हणजे वांगणी (Vangani) पूर्वेकडे. भगिरथ धबधबा (Bhagirath Waterfall) असे त्याचे नाव असून हा वांगणी रेल्वेस्थानकापासून 3 किमी अंतरावर आहे. ह्या धबधब्याला भेट दिलेल्या ग्रुप कडून ऐकलेला लेखाजोगा अनुभव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणे करुन तुम्ही वनडे पिकनिकसाठी या धबधब्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर या माहितीची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

1. प्रवास:

जर तुम्ही स्वत:ची गाडी घेऊन येणार असाल तर वांगणी पूर्वेकडील चारफाट्यावरून वांगणी गावाकडे रस्ता जातो. हाच रस्ता पुढे गावाची हद्द संपताच भगिरथ धबधब्याकडे जातो.तर ट्रेनने येणारे लोक वांगणी पुर्वेकडील बाजारपेठेतून रिक्षाने धबधब्यावर जाऊ शकतात.

2. खाण्याची सोय:

धबधब्यावर वडापाव, भुट्टा सोडल्यास बाकी खाण्यापिण्याची सोय नाही. वांगणी बाजारपेठेजवळ ज्ञानेश्वर मंगल कार्यालय आहे तिथेच साबीर गाझीचे छोटेसे आणि साधे हॉटेल आहे. येथे तुम्हाला पोहे, उपमा, गरमागरम चहा हा नाश्ता मिळू शकतो. त्याचबरोबर मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंग्सही मिळते. तसेच तो ऑर्डरनुसार बिर्याणी, चिकण, मटण, रस्सा, सुक्की भाजी, भाकरी, भात, व्हेज भाजी असं जेवण धबधब्यावर पार्सल पाठवून देतो.फक्त त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला आधी ऑर्डर द्यावी लागते. नंतर तो धबधब्याखाली आल्यावर फोन करून जेवण आणल्याची सूचना देतो. साबीर व्यतिरिक्त हायवेवर चारफाट्याजवळ देविदास शेलारचा आदित्य धाबा आहे. तो धबधब्यापर्यंत सेवा देत नाही. पण त्याच्या इथे व्हेज, नॉनव्हेज जेवण चांगलं मिळतं. विशेषत: त्याच्याकडचं लाव्हरीचं मटण फेमस आहे.

जर तुम्ही साबीर गाझीच्या हॉटेल मध्ये जेवण करणार असाल तर त्याचे स्वत: चे Eeco कार आहे. या कारने तुम्हाला धबधब्यावर नेण्याची व्यवस्था होऊ शकते. फक्त त्याचे पैसे तुम्हाला जेवणाव्यतिरिक्त वेगळे मोजावे लागतील. हे भाडे साधारण प्रत्येकी 20-25 रुपये इतके आहे. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल आणि तुमचा 8-9 जणांचा ग्रुप असेल तर त्याची गाडी हा उत्तम पर्याय आहे.

3. धबधब्याकडे जाण्याचा रस्ता:

मुख्य रस्त्यापासून 10-15 मिनिटांच्या अंतरावर हा भगिरथ धबधबा आहे. हा रस्ता चालण्यास चांगला असला तरी पावसामुळे थोडासा निसरडा होतो. तसेच जेथे हा धबधबा आहे तेथे छोटी पायवाट आहे मात्र ती ही छोट्या छोट्या दगडांची आणि निसरडी आहे. त्यामुळे ह्या खाजगी आणि भन्नाट धबधब्याची मजा घ्यायला जाणार असाल तर ग्रुप ने गेलेले केव्हाही चांगले. तसेच जर तुमच्या ग्रुपमध्ये मुली असतील तर शक्यतो शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी या धबधब्याला जावे. कारण विकेंड्स येथे खूप गर्दी असते.

Bhagirath Waterfall (Photo Credits: File Photo)

धबधब्याकडे जाणारा रस्ता हा खूपच इंटरेस्टिंग आणि अद्भूत अनुभव देणारा असा आहे. जेव्हा तुम्ही हा धबधबा बघाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की, जो रस्ता आपण पार करुन आलो, त्यानंतर एवढा सुंदर असा धबधबा पाहायला मिळेल.

हेही वाचा- पावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)

वांगणीच्या भगिरथ धबधब्याप्रमाणेच वांगणी पश्चिमेकडे पाषाणे आणि आर्डे गावाच्या जवळ वनलक्ष्मी धबधबा आहे. पण तिकडच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसल्याने लोक तिथे जात नाहीत.