Makar Sankranti 2019 : हे आहेत तीळ खाण्याचे फायदे; आयुर्वेदामध्येही सांगितले आहेत महत्व
तिळाचे लाडू (Photo Credits: Instagram, insta.shrads)

संक्रांतीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. उद्या संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. दक्षिणायन संपून उत्तरायणाची सुरुवात होईल. यावेळी संपूर्ण देशात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. संक्रांतीचा सण हा मनोसोक्त खाण्याचाही सण आहे. यावेळी भोगीची भाजी, तीळ गुळाचे लाडू खाल्ले जातात. संक्रांतीचा सण थंडीच्या मोसमात यतो, अशावेळी उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. यामध्ये मुख्यत्वे तिळाचा समावश केला जातो. आयुर्वेदामध्येही तिळाचे महत्त्व सांगितलेलं आहे. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. चला तर पाहूया काय आहेत तिळाचे फायदे

> तिळात कॅल्शियम आहे, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.

> तीळातील तंतुमय पदार्थामुळे कोठा साफ राहील. याचा फायदा मधुमेहींसाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होऊ शकतो. (हेही वाचा : जाणून घ्या भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीनही दिवसांचे महत्व)

> अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.

> बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅसेस होणे, पचन न होणे या सर्वांस आराम मिळतो.

> त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

> तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे. थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो

> लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.

तीळासोबत गुळाचेही अनेक फायदे आहेत. साजूक तुपाबरोबर गूळ सेवन केला, तर उष्ण पडत नाही. म्हणूनच तर संक्रातीला गुळाची पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. तीळ आणि गुळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, म्हणून संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार बनवण्याची पद्धत आहे.