Makar Sankranti 2019 : जाणून घ्या भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीनही दिवसांचे महत्व
मकर संक्रांती 2019 (Photo Credits: File Photo)

नवीन वर्षाचा स्वागतोत्सव साजरा झाली की, वेध लागतात ते वर्षातील पहिल्या सणाचे म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankrati) चे. खाण्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद, आप्तेष्टांची भेट, हळदी कुंकवाच्या निमित्ताने शेजाऱ्यांची भेट, पतंगोत्सव अशा सर्व प्रकारे आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते. याचसोबत मकरसंक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो, यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत. चला तर पाहूया काय आहे या तीन दिवसांचे महत्व

भोगी - महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. पौष महिन्यातील थंडी, नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवी पिकेदेखील येत असतात. म्हणूनच यादिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

संक्रांत – संपूर्ण भारतात संक्रांतीचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दक्षिणेत पोंगल तर, उत्तरेत लोहारी, बिहू या नावे हा सण साजरा होतो. या दिवशी संक्रांतीची पूजा केली जाते. संक्रांतीला जमिनीवर सूर्याची आकृती काढून तिच्या मध्यभागी सूर्य प्रतिमेची स्थापना व पूजा करणे व दोन शुभ्र वस्त्रांचे दक्षिणेसहित दान करणे हा या व्रताचा विधी आहे. कीर्ती, राज्यभोग, आरोग्य व दीर्घायुष्य यांचा लाभ या व्रतामुळे होतो असे व्रतराज या ग्रंथात म्हटले आहे. या दिवशी स्त्रिया मृत्तिका घटाचे वाण देतात. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात; विविध वस्तूंचेही वाण या दिवशी लुटले जाते. एक एकमेकांना तिळगुळ वाटतात. नात्यामध्ये असलेली कटुता दूर करून पुन्हा नव्याने नात्यात गोडवा निर्माण करण्याचा हा दिवस आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. या दिवशी अनेक भाविक गंगास्नान करतात.

किंक्रांत – सर्वसाधारणपणे हा दिवस अशुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने मारले होते. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये, भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती खावी, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी-कुंकू करावे अशा काही प्रथा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात.

मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असा एक समज आहे. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणातर्फे दिला जातो.