शांत झोपेसाठी नक्कीच फायदा होईल या छोट्या छोट्या गोष्टींचा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: C_Scott/pixabay)

खूप वेळा जीवनातील ताण तणाव, ऑफिसमधील टेन्शन यांमुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. याव्यतिरिक्त जेव्हा डोक्यामध्ये सतत विचारांचा भुंगा चालू असतो तेव्हाही रात्री शांत झोप लागत नाही. काही लोकांमध्ये ही समस्या फार पूर्वीपासून असते मात्र लोक याकडे दुर्लक्ष करतात. रात्री पूर्ण झोप न मिळाल्याने सकाळी उठल्यावर सुस्ती जाणवते, आळस आणि चिडचिडेपणातही वाढ होते. म्हणूनच झोपेची समस्या असेल तर त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये अनेक लोक पूर्ण आणि शांत झोप प्राप्त करण्यासाठी झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. मात्र प्रत्येकवेळी गोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही घरीच अनेक उपाय करू शकता किंवा स्वतःच्या जीवनशैलीमध्ये काही छोटे छोटे बदल करू शकता ज्यामुळे झोप न येण्याच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.

शांत आणि आरामदायी झोपेसाठी रात्री झोपण्याआधी आंघोळ करणे फायद्याचे ठरू शकते. मात्र यासोबतच इतर काही गोष्टींचाही नक्कीच फायदा होईल.

> शक्यतो झोपेच्या वेळा बदलू नये. झोपेच्या आधी दोन तास मनस्थिती खराब होईल, असा कोणताही मानसिक त्रास करून घेऊ नका. अथवा अशा प्रकारांच्या विचारांवर नियंत्रण ठेवा.

> झोपेआधी चहा, कॉफी; तसेच अमली पदार्थाचे सेवन करू नका.

> टीव्ही, मोबाइलपासून झोपेआधी किमान तासभर तरी दूर राहा. मोबाइलच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर आलेली झोप दूर जाते.

> सतत झोपेच्या जागा बदलू नका. कितीही वाजता झोप लागली, तरी उठण्याची वेळ बदलू नका. त्याने झोपेचे चक्र बिघडते.

> अंधार असताना तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे झोपता. त्यामुळे झोपताना खोलीतील मंद दिवे तसेच इतर प्रकाश बंद करा.

> झोपण्याच्या खोलीचे तापमान थंड असणे हे शांत झोपेसाठी अतिशय आवश्यक आहे, कारण कमी तापमान तुमच्या शरीराला आता झोपायची वेळ झाल्याचे सांगते.

> दुपारी शक्यतो झोपू नका

> दिवसभर पाण्याचे प्रमाण अधिक ठेवा. मात्र, रात्री झोपण्याआधी अतिरिक्त पाणी वा इतर पेये टाळा.

तर अशाप्रकारे शांत झोपेसाठी आपल्या जीवनशैलीमध्ये केलेले छोटेछोटे बदल नक्कीच फायद्याचे ठरू शकतील.