Kumbh Mela 2019 : पहा उपग्रहातून कसा दिसतो कुंभमेळा; ISRO ने काढला सॅटेलाईटद्वारे फोटो
कुंभ 2019, (Photo Credit: फाइल फोटो)

Kumbh Mela 2019 : प्रयागराज (Prayagraj) येथे मोठ्या थाटामाटात अर्धकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. दररोज लाखो लोक गंगास्नानाचे पुण्य पदरी बांधत आहेत. अंतराळातून दिसणारा एकमेव कार्यक्रम म्हणून कुंभमेळ्याकडे पहिले जाते. याबाबतचे अनेक फोटोज दररोज सोशल मिडियावर पोस्ट होत आहेत. अशातच आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) ने कुंभमेळ्याचा सॅटेलाईटद्वारे काढलेला फोटो प्रदर्शित केला आहे. इस्रोने भारतीय रिमोट सेंसिंग सॅटेलाइट कार्टोसॅट-2 मधून हे फोटो घेतले आहेत. गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटरवर इस्रोने हे फोटो पोस्ट केले आहेत.

समुद्रमंथनातून बाहेर आलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात बारा वर्षं संघर्ष सुरू होता. याच संघर्षात भारतातील चार ठिकाणी या अमृत कलशातील काही थेंब पडले. याच चार ठिकाणी म्हणजे प्रयागराज (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनमधील नदीतीरी दर 12 वर्षात तीन तीन वर्षांच्या अंतराने कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. (हेही वाचा : नागा साधूंची कथा तुम्हाला माहिती आहे का? जाणुन घ्या येथे)

भारतात्तील हा कुंभमेळा संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. यात देश विदेशातील लाखो भाविक हजेरी लावतात. रिपोर्टनुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी तब्बल 2 करोड भाविकांनी गंगास्नान केले. या वर्षीचा कुंभमेळा भव्य स्वरूपात होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने बराच खर्च करून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. युनेस्कोनेही कुंभ मेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा घोषित केले आहे.

भारतात होत असलेल्या कुंभमेळ्यापैकी प्रयागराज कुंभमेळ्याचे महत्व अधिक आहे. हा महाकुंभ तीन नद्यांच्या (गंगा, यमुना आणि लुप्त झालेली नदी सरस्वती) संगमावर होतो. 15 जानेवारीला सुरु झालेला हा महाकुंभ 4 मार्चपर्यंत चालेल.