
Kamini Roy 155th Birthday Google Doodle: बंगाली भाषेतील ख्यातनाम कवयत्री (Bengali Poet), स्वातंत्र्यकालीन सामाजिक कार्यकर्त्या व आंदोलक कामिनी रॉय (Kamini Roy)यांचा आज 155वा स्मृतिदिन आहे. या प्रित्यर्थ गुगल डूडल (Google Doodle) मार्फत या भारतीय प्रतिभावंत स्त्रीला मानवंदना देण्यात आली आहे. कामिनी यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1864 साली बंगाल प्रांतातील बाकेरगंज (आताच्या बांग्लादेश मधील एक भाग) येथे झाला होता. शब्दांवरील पकड व वास्तववादी कविता करण्यासाठी कामिनी ओळखल्या जात होत्या, याशिवाय महिला स्वातंत्र्य व हक्कांसाठी देखील त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. आज कामिनी रॉय यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांचे व्यक्तिमत्व व योगदानाविषयी जाणून घेऊयात..
कामिनी या एका प्रख्यात कुटुंबात जन्माला आल्या होत्या, त्यांचे भाऊ कोलकत्त्याचे महापौर होते तर बहीण ही नेपाळ मधील शाही कुटुंबात फिजिशियन होती. सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्यांना सुद्धा शिक्षणाची आवड होती, ज्यानुसार कामिनी रॉय यांनी बेथून कॉलेज मधून संस्कृत विषयात आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ब्रिटिशकाळात पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय आहेत. याशिवाय त्यांनी संशोधनात सुद्धा योगदान दिले आहे. सुरुवातीपासून त्यांना साहित्याची आवड असल्याने कामिनी या उत्तम कवयत्री होत्या. त्यांच्या अनेक लिखाणांपैकी 1989 साली आलेले Alo-O-Chhaya, हे पहिले कवितांचे पुस्तक आहे.
कामिनी यांची कॉलेज मध्ये अबला बोस नामक एका विद्यार्थिनींशी ओळख झाली ही महिला शिक्षण व विधवांचे हक्क याविषयात काम करता होती यातूनच प्रेरणा घेत त्यांनी तत्कालीन महिलांच्या उद्धारासाठी काम करण्याचा निश्चय केला. 1909 मध्ये कामिनी यांचे पती केदारनाथ रॉय यांच्या निधनानंतर त्यांनी बंग महिला समिती मध्ये सहभाग घेतला, आपल्या कवियतांच्या मार्फत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करत त्यांनी सुरुवातिला महिलांना स्वतःवरील अन्यायाची जाणीव करून दिली. महिलांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिला होता, ज्याचे यश म्ह्णून 1926 मधील निवडणुकीत पहिल्यांदा महिला मतदार दिसून आल्या.
कामिनी रॉय या कर्तृत्वान स्त्रीचे 1933 साली देहावसान झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनी लेटेस्टली मराठी कडून त्यांना विनम्र अभिवादन!