Yoga at Home, Yoga with Family थीम वर साजरा होणार यंदाचा जागतिक योग दिवस; आयुष मंत्रालयाकडून खास तयारी
Yoga Day 2019 (File Photo)

योगा हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. आज जगभरात योगाभ्यास केला जातो. दरवर्षी 21 जून दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो. दरम्यान यंदा भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचं सावट असल्याने यंदा त्याच्या सेलिब्रेशनवर काही बंधनं आहेत. मात्र अशा कठीण प्रसंगातही Yoga at Home, Yoga with Family थीम हा दिवस यंदा साजरा केला जाणार आहे. त्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यात तयारी सुरू आहे. कोव्हिड 19 या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठीदेखील भारतामध्ये आयुष मंत्रालयाकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. योग साधनेने कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी स्वतःला सुदृढ बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

यंदा 21 जून दिवशी दूरदर्शनवर ट्रेनर लेड सेशनचं लाईव्ह टेलिकास्ट सकाळी 6.30 वाजता केले जाणार आहे. दरम्यान घरबसल्या भारतीयांना ते पाहून योगाभ्यास करता येणार आहे. यंदा कोरोनाची दहशत असल्याने बाहेर न पडता घरच्या घरीच हा दिवस साजरा करण्यावर सरकारचं लक्ष असेल. त्यासाठी Yoga at Home, Yoga with Family कॅम्पेन सुरू झालं आहे. प्रसार भारतीकडून 11 जून पासूनच त्याला सुरूवात झाली आहे. सकाळी 8 ते 8.30 या 30 मिनिटांसाठी Common Yoga Protocol डीडी वर प्रसारित केला जातो.

जगभरात किमान 45 मिनिटांचा कॉमन योगा प्रोटोकॉल पाळून हा दिवस साजरा केलाजातो. यंदाही तशीच तयारी सुरू झाली आहे. दरम्यान यावर्षी जगभरात अनेक ठिकाणी सामान्यांना बाहेर पडून मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करता येणार नाही. भारतामध्येही संचारबंदी लागू असल्याने लोकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केले आहे.

योगाभ्यासाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही सहज कुठेही करू शकता. तुमच्या प्रकृती आणि क्षमतेनुसार वेगवेगळ्या योगासनांचा तुमच्या योगाभ्यासाच्या वेळेत समावेश करू शकता.