Sex Life | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Sexual Health in Men: व्यायाम, संतुलित आहार आणि व्यसनांपासून दूर राहूनही जर तुम्हाला लैंगिक दुर्बलता (Erectile Dysfunction) जाणवत असेल, तर तुमच्या व्हिटॅमिन D चा स्तर तपासण्याची गरज आहे, असा सल्ला संशोधक देत आहेत. ब्रिटिश जर्नल ऑफ फार्माकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन D ची कमतरता (Vitamin D Deficiency) आणि इरेक्टाइल डिसफंक्शन यामध्ये स्पष्ट संबंध आढळून आला आहे. त्यामुळे तुमच्या लैंगिक दुर्बलतेचा संबंध केवळ तुमच्या मानसिक किंवा इतर शारीरिक दुर्बलता, घटना घडामडींशी जोडू नका. तो तुमच्यातील ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे देखील उद्भवू शकतो.

अभ्यासात काय निष्कर्ष आढळले?

  1. संशोधकांनी मानव व प्राण्यांच्या जननेंद्रियाच्या ऊतींचा अभ्यास केला. व्हिटॅमिन D ची कमतरता असलेल्या उंदरांमध्ये, लिंगाच्या ऊतींमध्ये 40% पर्यंत अधिक कोलेजन साठा आढळून आला – ज्यामुळे ऊती कठीण होतात व इरेक्शनसाठी आवश्यक प्रतिसाद कमी होतो.
  2. मानवाच्या ऊतींमध्ये, ज्यांच्यात 25-hydroxyvitamin D चे प्रमाण कमी होते, त्यांच्याकडून नर्व्ह स्टिम्युलेशनला कमी प्रतिसाद मिळाला आणि लिंगातील रक्तवाहिन्यांचे आराम होणेही कमी प्रभावी होते. विशेष म्हणजे, ही कमतरता सिल्डेनाफिल (Viagra) सारख्या PDE5i औषधांच्या परिणामकारकतेत घट दर्शवते.
  3. संशोधनात हेही स्पष्ट झाले की, व्हिटॅमिन D रिसेप्टर्स हे लिंगाच्या स्नायूच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या रिसेप्टर्स शिवाय उंदरांमध्ये लैंगिक प्रतिसादात घट झाली आणि औषधांचा परिणाम कमी झाला.

या अभ्यासाचे महत्त्व

लैंगिक दुर्बलता म्हणजे केवळ वैयक्तिक समस्या नाही; ती अनेकदा हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या हृदयविषयक त्रासांची सुरुवात दर्शवते. या पार्श्वभूमीवर, व्हिटॅमिन D ची कमतरता हा एक नवीन जोखमीचा घटक म्हणून समोर येत आहे.

भारतातील ED आणि व्हिटॅमिन D ची स्थिती

  • ICRIER च्या अभ्यासानुसार, दर पाचपैकी एक भारतीय व्हिटॅमिन D च्या गंभीर कमतरतेने ग्रस्त आहे.
  • पूर्व भारतात, ही कमतरता 38.81% पर्यंत पोहोचते, असे ANVKA फाउंडेशनने नमूद केले आहे.
  • लैंगिक दुर्बलतेचा त्रास तरुणांमध्ये वाढत आहे – आज ED असलेल्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 25 पुरुष 30 वर्षांखालील आहेत, जे एक दशकापूर्वी फक्त 5 ते 7 होते.

भारतात व्हिटॅमिन D ची शिफारस केलेली दैनिक मात्रा:

वयोगट

शिफारस केलेले दैनिक प्रमाण (IU)

नवजात

400 IU
प्रौढ

400–600 IU

ज्येष्ठ नागरिक

800 IU पर्यंत

दरम्यान, जरी हे निष्कर्ष आशादायक असले, तरी मोठ्या प्रमाणात जनतेवर अधिक क्लिनिकल चाचण्या आवश्यक आहेत. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की, ED चा सामना करणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या व्हिटॅमिन D चा स्तर तपासणे हा उपचारांचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो – विशेषतः जेव्हा नियमित औषधोपचारांचा परिणाम होत नाही.