Monkeypox Update: मानवापासून कुत्र्याला मंकीपॉक्स विषाणूचे संक्रमण; वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर WHO ने दिली चेतावणी
Monkeypox Virus | (Photo Credits: Wikimedia Commons)

Monkeypox Update: जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) ची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 35000 झाली आहे. गेल्या आठवडाभरात 7500 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली असून त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. पॅरिस, फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग मानवाकडून कुत्र्यात पहिल्यांदाच झाला आहे. ही जगातील पहिली दुर्मिळ केस आहे.

दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा विषाणू माणसापासून कुत्र्यामध्ये पसरल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अलर्ट जारी केला आहे. WHO ने मंकीपॉक्स ग्रस्त लोकांना प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये असा सल्ला दिला आहे. बुधवारी मानवाकडून कुत्र्यामध्ये संक्रमणाचा पहिला अहवाल समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्राण्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. (हेही वाचा - Vaccine On Omicron: सिरम इन्स्टिट्यूट ओमायक्रॉनच्या B5 व्हॅरियंटविरोधात लस निर्मिती करणार)

मेडिकल रिसर्च जनरल लॅन्सेटनेही या प्रकरणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर मंकीपॉक्स वेगवेगळ्या लोकसंख्येतील प्राण्यांमध्ये आणि मानवांमध्ये पसरला, तर तो वेगवेगळ्या प्रकारे विकसित होण्याची आणि उत्परिवर्तन होण्याची शक्यता आहे. यामुळे आणखी धोका वाढेल.

तथापी, डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांच्या मते, ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, एका कुत्र्यात मंकीपॉक्स विषाणू एका माणसापेक्षा जास्त वेगाने विकसित होणार नाहीत. मात्र, तरीही लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी मांकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 92 देशांमध्ये मंकीपॉक्सची 35,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि यामुळे 12 लोकांचा मृत्यूही झाला आहे.

गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सची सुमारे 7,500 प्रकरणे नोंदवली गेली आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीवर चिंता व्यक्त करत डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी ते रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले.