हुशार मुलांच्या 'स्मार्ट'फोन वापरणाऱ्या पालकांसाठी.....
स्मार्टफोन आणि लहान मुले (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

काय सांगता? तुमचा मुलगा स्मार्टफोनशी खेळतो? अरे व्वा! कसं जमतं हो त्याला? काहीही म्हणा आजची पिढी फारच हुशार!, असं तुमच्या मुलांचं कोणी कौतुक करत असेल तर, अजिबात हुरळून जाऊ नका. या पोकळ कौतुकाने तुमचं ऊर तत्पुरतं भरुन येईल. आपण हुशार मुलांचे आई-बाबा असल्याचे फिलींगही तुम्हाला येईल. पण, लक्षात ठेवा हा आनंद तात्पुरता असेल. वयाने लहान असलेला तुमचा मुलगा किंवा मुलगी जर स्मार्टफोनशी खेळत असतील, मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, बैठे गेम यावर जास्तीत जास्त वेळ खर्च करत असतील तर, सतर्क व्हा. त्यांच्या हातातील मोबाईल काढून घ्या. जगभरातील अनेक अभ्यासक सांगत आहेत की, मुलांना डिजिटल गॅझेट्सपासून शक्य तितक्या दूर ठेवा. भारतात सध्या टॉपला असलेल्या टेक इंडस्ट्रीतले रती-महारतीसुद्धा हेच सांगत आहेत.

मोठ्या लोकांचे छोट्या गोष्टीकडे असते लक्ष

स्नॅपडीलचा सहसंस्थापक कुणाल बहलच्या जेव्हा लक्षात आले की, त्याची तीन वर्षांची मुलगी तमीरा मोबाईलवर जास्तीत जास्त वेळ खर्च करते आहे. तर, त्याने लगेच तिचा फोन काढून घेतला. फोन वापरण्यासाठी त्याने तिला चक्क काही मिनिटांचीच परवानगी दिली. डिजिटल वॉलेट आणि ऑनलाईन रिचार्ज कंपनी मोबीक्विकची सहसंस्थापक उपासना टाकू आपल्या १.३ वर्षांच्या मुलाला आठवड्यातून आर्ध्या तासापेक्षा अधिक काळ टीव्ही पाहू देत नाही. ऑनलाईन गिफ्ट इंडस्ट्रीशी संबंधीत क्विकक्लिकचे प्रताप टीपी यांना दोन मुले आहेत. या दोन मुलांसाठीही डिजिटल गॅझेट्स काही काळासाठीच वापरण्याची मान्यता आहे. कारण त्यांच्या खेळ आणि अभ्यासावर परिणाम होऊ नये. अभ्यासक सांगतात की, लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे हे अत्यंत धोकादायक आहे.

..अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही

स्मार्टफोन, टीव्ही, कार्टून, बैठे खेळ आदींची लहान मुलांना लागलेली सवय लगेच जाणार नाही. कारण ती एका दिवसात लागली नाही. त्यामुळे ती सोडविण्यासाठी पालकांना कष्ट नक्कीच घ्यावे लागतील. दरम्यान, ही मुले चिडतील, गोंधळ घालतील, हट्ट करतील. पण, हे सर्व शांततेने स्वीकारा. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला हे कारवेच लागेल. अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. (हेही वाचा, डीप्रेशन: तरुणाईला सोसवेना 'सोशल मीडिया'चा भार; अनेक वेडेपीसे, काहींवर उपचार सुरु)

कदाचित आपल्याला माहित नसेल....

-जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्सच्या मुलांना वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत मोबाईल मिळाला नव्हता.

-जगाला आयफोन, आयपॅड देणारा स्टीव्ह जॉब्जनेही आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवले.

-सिलिकन व्हॅलीमध्ये मुलांना नॉन-टेक्नो शाळांमध्ये पाठविण्याचा ट्रेंड वाढतो आहे.

या गोष्टींची काळजी घ्या

-झोपताना फोन, टॅब दूर ठेवा. गजर लावण्यासाठी घड्याळाचा वापर करा.

-आठवड्यातून किमान एक दिवस तरी, काही तास मोबाईलपासून दूर राहा.

-डोळ्यांचा कोरडेपणा घालविण्यासटी दर पाच सेकंदांनी पापण्या मिटण्याची सवय कायम ठेवा.

अल्पापधीत जाणवणारा धोका

-जी मुले फोनवर अधिक वेळ गाणी पाहतात, ऐकतात, अतीप्रमाणात व्हिडिओ पाहतात ती मुले सर्वसामान्य मुलांपेक्षा उशीरा बोलू लागतात.

-मुलांची एकाग्रता कमी होते. डोळ्यांमधला कोरडेपणा वाढतो. नवनवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता कमी होते. लहानवयातच लठ्ठपणा वाढतो.