Sex Without Condom: युरोपमधील डब्ल्यूएचओ (WHO) प्रादेशिक कार्यालयाच्या अलीकडील अहवालात 2014 पासून लैंगिकदृष्ट्या सक्रिय किशोरवयीन मुलांमध्ये कंडोमच्या (Condom) वापरामध्ये चिंताजनक घट झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब असुरक्षित लैंगिक संबंधांच्या वाढीचे प्रतिबिंब आहे. या चिंताजनक प्रवृत्तीमुळे तरुणांमध्ये लैंगिक संक्रमित संसर्ग (STIs) आणि अनियोजित गर्भधारणेचा धोका वाढतो. हे निष्कर्ष हेल्थ बिहेवियर इन स्कूल-एज्ड चिल्ड्रन (HBSC) अभ्यासातून आले आहेत. यामध्ये 2014 ते 2022 दरम्यान 42 देशांमधील 242,000 15 वर्षांपेक्षा जास्त मुलांचे सर्वेक्षण केले.
या अहवालात दावा करण्यात आला आहे की, युरोपीय देशांमध्ये सुमारे एक तृतीयांश मुला-मुलींनी कबूल केले आहे की त्यांनी शेवटच्या शारीरिक संबंध ठेवताना कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या नाहीत. 2018 पासून या सवयीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे असुरक्षित सेक्समुळे होणारे आजार आणि नको असलेली गर्भधारणा होण्याचा धोका वाढला आहे.
डब्ल्यूएचओने नुकतेच युरोप आणि मध्य पूर्वेतील 42 देशांमध्ये सर्वेक्षण केले. ज्यामध्ये 15 वर्षे वयोगटातील 2,42,000 किशोरवयीन मुलांचा समावेश होता. त्यांना विचारलेल्या प्रश्नांनुसार, शेवटच्या वेळी कोणाशी तरी संबंध ठेवताना कंडोम वापरणाऱ्या मुलांची संख्या 2014 मध्ये 70% वरून 2022 मध्ये 61% झाली आहे. अहवालानुसार, शेवटच्या वेळी कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या मुलींची संख्या 63 टक्क्यांवरून 57 टक्क्यांवर आली आहे. याचा अर्थ, सुमारे एक तृतीयांश किशोरवयीन मुले शारीरिक संबंध ठेवताना कंडोम वापरत नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार 2014 ते 2022 पर्यंत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर स्थिर राहिला आहे. 15 वर्षांच्या 26 टक्के मुलींनी शेवटच्या वेळी सेक्स करताना या गोळ्या घेतल्या होत्या. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील 33% किशोरवयीन मुलांनी कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या नाहीत, तर उच्च वर्गीय कुटुंबातील किशोरवयीन मुलांची संख्या 25% होती.
याबाबत डब्ल्यूएचओ युरोपचे संचालक हंस क्लुगे म्हणतात की, आजही युरोपातील अनेक देशांमध्ये लैंगिक शिक्षण दिले जात नाही. असुरक्षित शारीरिक संबंधांचे धोके आणि तोटे तरुणांना योग्य वेळी न सांगल्यामुळेही हा प्रकार वाढत आहे. जर तरुणांना असुरक्षित सेक्सच्या हानीबद्दल योग्य वेळी माहिती दिली नाही, तर लैंगिक रोग आणि लोकसंख्या वाढण्याचा धोका आहे.