Regular Health Checkup: कधी केली होती शेवटची आरोग्य तपासणी? जाणून घ्या वाढत्या वयातील हेल्थ चेकअपचे महत्व व करून घ्याव्याच अशा तपासण्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ICPCM/Facebook)

डॉक्टरांचे कार्य केवळ रोगाचा योग्य उपचार करणे हे आहे असाच आपल्या सर्वांचा समज असतो. कधी कधी डॉक्टरदेखील हेच मानतात. मात्र डॉक्टरांचे कार्य हे केवळ रोग्याला बरे करणे नसून एखाद्या व्यक्तीला रोगापासून दूर ठेवणे हेदेखील आहे. आपल्या देशात इतके आजार आहेत, वय वाढेल तसे हे आजार वरचेवर आपल्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत राहतात. यात डायबेटिस, उच्च रक्तदाब अशा गोष्टी तर सर्वसामान्य आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी आजाराच्या निमित्ताने डॉक्टरांना भेटण्याऐवजी हे आजारच दूर ठेवले तर? शरीरात आजार फोफावण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे आजार आपल्या शरीरात आहेत हेच माहित नसणे. अशावेळी वेळोवेळी आरोग्य तपासणीची (Health Checkups) गरज भासते.

सामान्यत: एक प्रश्न सर्वांनाच भेडसावतो तो म्हणजे, आरोग्य तपासणी कोणत्या वयात सुरू करावी? मात्र लक्षात घ्या आपण बरे नाही म्हणून आरोग्य तपासणी करणे गरजेचे नाही, तर खबरदारी म्हणून, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची गरज नसून आपल्या तब्येतीबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. मात्र मध्यम वयोगटातील प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर निश्चितच तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे जर काही आजार होणार असतील तर वेळेआधी त्यांचे निदान होऊन त्यावर अचूक उपचार केले जाऊ शकतील.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये जवळजवळ प्रत्येकाचेच शरीराकडे दुर्लक्ष होते. त्यात जसजसे वय वाढत जाते तसतसे हाडे ठिसूळ होतात, शरीरातील अनेक पेशी कमकुवत होण्यास सुरवात होते, काही इंद्रियांची नवीन पेशी उत्पन्न करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. किडनीचे कार्य मंदावते, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते, स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल घडतात. यासोबत हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, लठ्ठपणा, पोटाचे विकार, दाताचे, डोळ्यांचे आजार वाढत जातात. म्हणूनच मुख्यत्वे चाळीशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीला नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

तर कोणत्या तपासण्या कराव्यात? आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हृदय आरोग्य चाचणी, कोलेस्ट्रॉल चाचणी, मेधुमेह तपासणी, हाडांची तपासणीन, कर्करोग स्क्रीनींग, डोळ्यांची चाचणी, त्वचेची तपासणी, दातांची तपासणी, व्हिटॅमिन हेल्थ चेकअप, किडनी फंक्शन टेस्ट, एक्स-रे, युरीन टेस्ट अशा काही महत्वाच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. यासह जर का तुम्ही पूर्ण बॉडी चेकअप करत असाल तर यातील बऱ्याच तपासण्या त्यात कव्हर होतील. (हेही वाचा: थंडीमुळे एलर्जी किंवा वारंवार सर्दी होत असेल तर जाणून घ्या 'हे' सोपे घरगुती उपाय)

तर या सर्व तपासण्यांमधून काय समजते? यामध्ये आपले शरीर फिट आहे की नाही, जर रोगाचा धोका असेल किंवा सुरुवात झाली असेल तर तेही यामध्ये समजू शकेल, एखाद्या अनुवांशिक रोगाबद्दल यामध्ये माहिती मिळेल, भविष्यातील रोगांबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता यासह तुम्हाला एखाद्या लसीची आवश्यकता आहे की नाही हे देखील समजेल. शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आहार कसा असावा व तुम्हाला कोणत्या व्यायामाची गरज याची माहिती मिळू शकेल.

अशाप्रकारे वाढत्या वयामध्ये शरीर निरोगी, सुदृढ राहण्यासाठी, विविध रोगांना दूर ठेवण्यासाठी आरोग्य तपासणी अतिशय महत्वाचे आहे.