IIT Delhi scientist Prof Kavya Dashora awarded first prize for innovation of mock egg (Photo Credits: Twitter/IIT Delhi)

आयआयटी दिल्लीद्वारे (IIT Delhi) प्लांट बेस्ड मॉक अंड्याचा (Plant-Based Mock Egg) शोध लावण्यात आला आहे. आयआयटी दिल्ली येथे शोध लावले गेलेले हे बनावट अंडे वाढीस उपयुक्त असून ते आहारातील प्रोटीनच्या गरजा भागवते. तसेच आरोग्याबाबत जागरूक असलेल्या इतर निकषांची पूर्तताही करते. विशेष गोष्ट म्हणजे आयआयटी दिल्लीने बनविलेले हे बनावट अंडे खाण्यास चवदार आहे आणि पूर्णपणे शाकाहारी आहे. या शोधासाठी आयआयटी दिल्लीला इनोवेट्स फॉर एसडीजी स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यूएनडीपी (युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम) एक्सेलेरेटर लॅब इंडियातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हा शोध आयआयटी दिल्लीच्या ग्रामीण विकास व तंत्रज्ञान केंद्राच्या प्राध्यापक काव्या दशोरा यांनी लावला आहे.

जर्मनीच्या आर्थिक सहकार आणि विकास प्रमुखांनी आयआयटी दिल्लीला हा पुरस्कार प्रदान केला. यासाठी 5000 डॉलर्सचे बक्षीस प्रदान करण्यात आले आहे. या नावीन्यपूर्णतेसाठी आयआयटी दिल्लीला ऑनलाईन पुरस्कार देण्यात आला आहे. यूएनडीपीच्या मते, ‘मॉक एग इनोव्हेशन एक एक परिपूर्ण नावीन्य आहे. हे  नक्कल केलेले अंडे आहारातील प्रथिनांच्या आवश्यक गरजा पूर्ण करते. शाकाहारी पदार्थांपासून बनविलेले हे बनावट अंडे लोकांची भूक भागवते आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतेक आवश्यकतांची पूर्तता करते.’

याबाबत बोलताना प्रो. काव्या दशोरा म्हणाल्या, 'कुपोषण आणि योग्य प्रथिनेसाठीच्या लढाईला तोंड देण्याच्या उद्देशाने अंडी, मासे आणि चिकनशी मिळतेजुळते वनस्पती-आधारित पदार्थ तयार केले गेले आहेत. हा लोकांसाठी प्रथिनेयुक्त आहार आहे. मॉक अंडे अगदी सोप्या शेतीवर आधारित पिकापासून विकसित केले गेले आहेत. प्रथिने, जो फक्त अंड्यासारखाच दिसत नाही तर, तो पौष्टिक आणि चवदारही आहे.' अंड्याव्यतिरिक्त आयआयटी दिल्ली येथील शास्त्रज्ञांनीही चिकनसाठी मीट एनालॉग्स विकसित केले आहेत. तसेच फळ आणि भाजीपाला वापरुन वनस्पती स्त्रोतांपासून मासे उत्पादनांची चाचणी केली गेली आहे.