COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca ची कोरोना व्हायरस वरील लस युके मध्ये पुढील 3 महिन्यांत तयार- रिपोर्ट्स
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) ची कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून कमीत कमी 3 महिन्यात ही लस युकेमध्ये (UK) रिलीज होईल, अशी महिती समोर येत आहे. टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस वरील या लसीचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन 3 महिन्यांत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना लवकरात लवकर ही लस मिळेल. (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सच्या स्थगितीनंतरही या वर्षाअखेरपर्यंत लस तयार होण्याची शक्यता; अ‍ॅस्ट्राझेनेका सीईओ Pascal Soriot)

2021 सुरु होण्यापूर्वी या लसीला मंजूरी मिळेल, अशी आशा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीवर काम करणाऱ्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. सर्व प्रौढ व्यक्तींना 6 महिन्याच्या आत या लसीचे डोस उपलब्ध होतील, असे काही आरोग्यतज्ञांचे म्हणणे आहे. या लसीचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या सरकारी सुत्रांनी टाईम्सशी बोलताना सांगितले की, लसीला मंजूरी मिळाल्यानंतर लहान मुलं वगळता प्रौढांसाठी ही लस पुढील 6 महिन्यात उपलब्ध होईल.

दरम्यान, अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेली कोविड-19 वरील लसीचा अभ्यास युरोपीयन मेडिसिन एजेन्सीने सुरु केला आहे. त्यांच्या या अभ्यासामुळे लसीला मंजुरी मिळण्याची प्रक्रीया वेगाने होण्यास मदत होईल. कोविड-19 वरील अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस यशस्वी ठरेल, अशी युरोपीयन मेडिसिन एजेन्सीला आशा आहे. तसंच या लसीला 2020 अखेरपर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता युरोपीयन मेडिकल एजन्सीचे लसीचे प्रमुख Marco Cavaleri यांनी वर्तवली आहे.

भारतातील सीरम इंस्टीट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनेका सोबत करार करत या लसीचे उत्पादन भारतात करण्याचे काम हाती घेतले आहे. संपूर्ण देशभरातील 1600 व्यक्तींवर या लसीच्या चाचण्या करण्यात येतील. भारता शिवाय साऊथ आफ्रीका आणि ब्राझील या देशांतही लसीच्या चाचण्या सुरु आहेत.

कोरोना व्हायरस संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरातील अनेक देश त्रस्त आहेत. कोविड-19 च्या जागतिक आरोग्य संकटामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तसंच कोरोना संसर्गामुळे लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. लस उपलब्ध झाल्यास संकट टळेल आणि जीवनमान पूर्वपदावर येण्यास मदत होईल. त्यामुळेच लसीच्या विकासाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.