Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) च्या  लसीच्या क्लिनिकल ट्रायलला स्थगिती मिळाली असली तरी ही लस या वर्षाच्या अखेरपर्यंत तयार होण्याची शक्यता असल्याचे  AstraZeneca कडून गुरुवारी (10 सप्टेंबर) सांगण्यात  आले आहे. ऑनलाईन कॉन्फरन्स (Online Conference) दरम्यान अ‍ॅस्ट्राझेनेका चे सीईओ Pascal Soriot यांनी ही लस 2020 च्या अखेरपर्यंत तयार होईल असा विश्वास गुंतवणूकदारांना दिला.

दरम्यान, युके मध्ये या लसीच्या मानवी चाचण्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे AstraZeneca ने मंगळवारी (8 सप्टेंबर) सांगितले होते. लस दिलेली व्यक्ती आजारी पडल्याने या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स थांबवण्यात आल्या आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संयुक्तपणे ही लस तयार करत आहेत. लसीच्या मानवी चाचणीमध्ये घेण्यात आलेला ब्रेक हा अगदी सामान्य आहे. लसीच्या विकासादरम्यान लस दिलेली व्यक्ती आजारी पडल्यास त्या कारणाचा शोध घेईपर्यंत ट्रायल्समध्ये ब्रेक घेणे गरजेचे आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु आहेत. जगातील 50 हजार हून अधिक लोकांनी या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभाग नोंदवला आहे. (COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचणीला भारतातही स्थगिती; Serum Institute ची माहिती)

भारतात सीरम इंस्टिट्युटकडून या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु होत्या.  यात भारतातील 17 विविध शहरांमधील तब्बल 1600 रुग्ण सहभागी झाले आहेत. मात्र युकेमधील स्थगितीनंतर Drug Controller General of India च्या आदेशानुसार भारतातील मानवी चाचण्याही थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सीरम इंस्टिट्युटकडून देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस संसर्गावर मात करण्यासाठी ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक असून त्यामुळे कोरोना लसीच्या विकासाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दरम्यान ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका च्या लसीला मिळालेल्या ब्रेकमुळे निराशा पसरली आहे. परंतु, अ‍ॅस्ट्राझेनेका चे सीईओ Pascal Soriot यांनी व्यक्त केलेला विश्वास पुन्हा एकदा आशा पल्लवित करत आहे.