COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचणीला भारतातही स्थगिती; Serum Institute ची माहिती
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

सीरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) च्या कोविशिल्ड (Covishield) लसीची मानवी चाचणी भारतातही थांबवली आहे. या लसीच्या चाचण्या 17 वेगवेगळ्या ठिकाणी चालू होत्या. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या  (Drug Controller General of India) पुढच्या आदेशापर्यंत या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती सीरम इंस्टीट्युटकडून (Serum Institute of India) देण्यात आली आहे.

"आम्ही परिस्थितीची पाहणी करत आहोत. AstraZeneca जोपर्यंत ट्रायल्स सुरु करत नाहीत तोपर्यंत भारतातील लसीची मा्नवी चाचणी थांबवण्यात आली आहे. आम्ही Drug Controller General of India च्या नियमांचे पालन करत आहोत. त्यामुळे आम्ही लसीच्या पुढील चाचण्या करु शकणार नाही," असे सीरम इंस्टिट्युटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ANI Tweet:

लस दिलेली व्यक्ती आजारी पडल्याने युके मध्ये या लसीची मानवी चाचणी थांबवण्यात आली होती. मात्र भारतात लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सला कोणताही अडथळा नसल्याने ट्रायल्स सुरु राहतील, असे काल सीरम इंस्टिट्युटकडून सांगण्यात आले होते. परंतु, आज भारतातही लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे.

कोविशिल्ड लसीच्या चाचण्या इतर देशात थांबवण्यात आल्या असून भारतात त्या अद्याप का सुरु आहेत?  असा प्रश्न ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने उपस्थित केल्यानंतर सीरम इंस्टिट्युटकडून लसीच्या चाचण्यांना स्थगिती देण्यात आली.

कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संकट जगावर कायम आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. त्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कोविशिल्ड लसीच्या चाचण्या थांबवल्याने काहीसे निराशदायी वातावरण निर्माण झाले आहे.