COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी भारतात सुरु राहणार; युके मधील स्थगितीनंतर सीरम इंस्टीट्यूटची माहिती
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

युकेमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) च्या कोविशिल्ड (Covishield) लसीची क्लिनिकल ट्रायल तात्पुरती थांबवण्यात आली असली तरी या लसीचे क्लिनिकल ट्रायल भारतात सुरु राहणार आहे. अशी माहिती सीरम इंस्टिट्युड ऑफ इंडियाकडून (Serum Institute of India) देण्यात आली आहे. आतापर्यंत भारतात सुरु असलेल्या ट्रायल्समध्ये कोणताही अडथळा आलेला नाही, असे इंस्टिट्युटकडून सांगण्यात आले आहे.

"आम्ही युके मधील ट्रायल्सबद्दल काही बोलू शकत नाही. पण त्या पुढील रिव्ह्युसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या पुन्हा सुरु होतील, अशी आशा आहे. भारतातील ट्रायल्स बद्दल बोलायचे झाले तर त्या सुरु राहतील आणि आम्हाला त्यात कोणताही अडथळा आलेला नाही," असे सीरम इंस्टीट्यूटकडून सांगण्यात आले आहे. (COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला तात्पुरता ब्रेक)

ANI Tweet:

The LiveMint च्या रिपोर्टनुसार, सीरम इंस्टिट्युड ऑफ इंडियाने या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु केल्या आहेत. यात भारतातील 17 विविध शहरांमधील तब्बल 1600 रुग्ण सहभागी झाले आहेत. दरम्यान लस दिलेली व्यक्ती आजारी पडल्याने युके मध्ये मानवी चाचणी थांबवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली होती.

कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाने जगभरातील अनेक देशांना ग्रासले आहे. जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने आता ब्राझीलला मागे टाकले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका प्रथम असून भारत दुसऱ्या स्थानी आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 43 लाखांच्या पार गेला असून मृतांची संख्या 73 हजारांहून अधिक झाली आहे. दिवसागणित कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या विकासाकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.