Omicron प्रकार त्वचेवर 21 तास आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर तब्बल 8 दिवस जगू शकतो; संसोधनात मोठा खुलासा
Coronavirus (Photo Credit: IANS)

एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की SARS-CoV-2 विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron) प्रकार त्वचेवर 21 तास, तर प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आठ दिवसांपर्यंत जगू शकतो. हा प्रकार अधिक सांसर्गिक असण्यामागे हे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. हा अभ्यास जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केला आहे. त्यांनी वुहानमध्ये सापडलेल्या SARS-Cov-2 विषाणूच्या विविध पृष्ठभागावर जगण्याच्या क्षमतेची इतर गंभीर व्हेरिएंटशी तुलना केली.

संशोधकांना असे आढळून आले की अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकार त्वचेवर आणि प्लॅस्टिकच्या आवरणावर विषाणूच्या वुहान व्हेरिएंटपेक्षा दुप्पट जास्त काळ राहू शकतात. हेच कारण आहे की चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या मूळ व्हेरिएंटपेक्षा या नव्या प्रकारांमधून संसर्ग होण्याचे प्रमाण खूप जास्त नोंदवले गेले आहे. संशोधकांनी नोंदवले की, वुहान व्हेरिएंट प्लास्टिकच्या पृष्ठभागावर सरासरी 56 तास जगू शकतो, तर अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकार अनुक्रमे 191.3 तास, 156.6 तास, 59.3 तास, 114 तास आणि 193.5 तास जगू शकतात.

संशोधकांच्या मते, वुहान व्हेरिएंट त्वचेवर 8.6 तास टिकू शकतो. त्याच वेळी, अल्फा प्रकार 19.6 तास, बीटा प्रकार 19.1 तास, गॅमा प्रकार 11 तास, डेल्टा प्रकार 16.8 तास आणि ओमायक्रॉन प्रकार 21.1 तास टिकू शकतो. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती विकसित होते, जी केवळ ओमायक्रॉनच नाही तर डेल्टासह इतर प्रकारच्या विषाणूंनाही निष्प्रभ करू शकते. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की ओमायक्रॉन-निर्मित प्रतिकारशक्ती डेल्टा प्रकारच्या विषाणूला निष्प्रभ करू शकते. यामुळे डेल्टा पासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. यामुळे संसर्ग पसरवण्याच्या बाबतीत डेल्टाचे वर्चस्व संपुष्टात येईल. मात्र, अहवालात ओमायक्रॉनला लक्ष्य करून लस बनविण्यावर भर देण्यात आला आहे. (हेही वाचा: COVID19: एकच मास्क 5 पेक्षा अधिक वेळ वापरणे टाळा, तज्ञांनी पुर्नवापराबद्दल दिला 'हा' सल्ला)

एकूण 39 लोकांवर हा अभ्यास करण्यात आला, त्यापैकी 25 जणांना AstraZeneca च्या अँटी-कोरोनाव्हायरस लसीचे दोन्ही डोस मिळाले होते, आठ जणांना Pfizer च्या लसीचे दोन्ही डोस मिळाले होते आणि सहा जणांना अँटी-कोरोनाव्हायरस लस मिळाली नव्हती. याशिवाय 39 पैकी 28 लोक यूएई, आफ्रिकन देश, मध्य आशिया, अमेरिका आणि ब्रिटनमधून परतले होते, तर 11 लोक उच्च जोखमीच्या संपर्कात होते. या सर्व लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली होती.