भारतामध्ये कोविड 19 मधून ठीक झालेल्या अनेक रूग्णांना कालांतराने म्युकर माईकोसिसचा ( Mucormycosis) सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. हा आजार काळी बुरशी (Black Fungus) म्हणून देखील ओळखला जातो. दरम्यान हा जीवघेणा आजार भयंकर असल्याने सध्या समाजात याची दहशत आहे. आणि याच भीतीचा गैरफायदा घेत काही समाजसंकट सोशल मीडियामध्ये याबाबत खोटी माहिती, अफवा पसरवत आहेत. पण आजारांबाबत इंटरनेट वर सर्च करून कोणतेही तथ्यहीन रिपोर्ट्स किंवा व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड्स वर विश्वास ठेवणं टाळा. वेळोवेळी या म्युकर माईकोसिस आजाराबाबत सरकार कडून माहिती दिली जात आहे. त्याची लक्षणं, कारणं, उपाय याची माहिती वाचून त्यानुसार पुढील निर्णय घ्या.
म्युकर माईकोसिस हा एक बुरशी जन्य आजार आहे. त्यामुळे आता वैयक्तिक स्वच्छता किती महत्त्वाची आहे याची प्रचिती अनेकांना पुन्हा नव्याने आली असेल. केंद्र सरकारनेही या आजाराला आता नोटेबल डिसीज म्हणजे या आजाराच्या प्रत्येक रूग्णांची माहिती ठेवली जाईल असे सांगितले आहे. दरम्यान हा आजार संसर्गजन्य नाही पण जीवघेणा असल्याने त्याबाबत अनेक अनेक उलटसुलट चर्चा आहेत. मग घरात कांद्यांवर, फ्रीज मध्ये दिसणारी बुरशी देखील जीवघेणी आहे का? असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर आजच दूर करा त्याबाबातची संदिग्धता.
घरात कांद्यांवर किंवा फ्रीज मध्ये बुरशी आढळत असेल तर की जीवघेणी आहे का?
घरात कांद्यांवर किंवा फ्रीज मध्ये आढळाणारी बुरशी ही ब्लॅक फंगस किंवा म्युकर माईकोसिस असू शकते याचा अद्याप कोणताही थेट संबंध वैज्ञानिक समोर आणू शकलेले नाहीत. US department of agriculture च्या माहितीनुसार, कांद्यावर आढळणारी काळी बुरशी ही aspergillus niger असते. ही सामान्यपणे मातीमध्ये असते. ही जीवघेणी नाही. त्यामुळे तिला टाळायचं असेल तर कांदे वापरण्यापूर्वी नीट स्वच्छ धुवून घ्या. फ्रीज नियमित स्वच्छ करत जा.
कच्ची फळं खाल्ल्यास काळी बुरशीचा धोका आहे का?
एम्स चे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कच्ची फळं खाल्याने काळी बुरशीचा त्रास होऊ शकतो याचाही कोणता पुरावा मिळालेला नाही. सध्या अशी माहिती देणारे मेसेजेस फिरत आहेत पण त्याबाबतचा वैज्ञानिक डाटा नाही.
दरम्यान तुम्ही कोणत्या प्रकारचा ऑक्सिजन वापरत आहात यावरही म्युकर माईकोसिसच्या धोक्याबाबत माहिती मिळालेली नाही. घरात असलेल्या होम आयसोलेशन रूग्णांमध्येही काळी बुरशी आढळली आहे.
सध्या म्युकर मायकोसिसचा धोका पाहता मनात भीती येणं सहाजिक आहे. महाराष्ट्रातील पुण्यात आता म्युकर मायकोसिसचे रूग्ण देखील सर्वाधिक आहेत त्यामुळे वेळीच लक्षणं ओळखून उपचार घेणं आवश्यक आहे.