Representative Image( Pic Credit-ANI)

कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात जगात आणखी एक मोठा आजार पसरू लागला आहे. या आजाराचे नाव 'मंकीपॉक्स' (Monkeypox) असे आहे. जगातील अनेक देशांमध्ये या आजाराचे रुग्ण समोर आले आहेत. परंतु हा आजार नक्की कसा पसरतोय याबाबत आरोग्य तज्ज्ञ अजूनही साशंक आहेत. आता या आजारावर डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा आजार पसरण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु या आजाराच्या प्रसारासाठी लैंगिक संबंध (Sex) हे एक मोठे कारण असू शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही 'मंकीपॉक्स' ग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवले तर तुम्हाला या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. युनायटेड किंगडमच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने या विषाणूबाबत 'गे आणि बायसेक्शुअल पुरुषांबद्दल' चेतावणी दिली आहे. समलिंगी किंवा बायसेक्शुअल पुरुषांच्या शरीरावर पुरळ किंवा जखमा दिसल्यास त्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे या इशाऱ्यात म्हटले आहे. 6 मे रोजी मंकीपॉक्सच्या नवव्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर ब्रिटनने ही चेतावणी जारी केली आहे.

UKHSA ने प्रामुख्याने समलिंगी आणि बायसेक्शुअल गट किंवा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये 'मंकीपॉक्स’ची पुष्टी केली आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यात मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. मॅसॅच्युसेट्स आरोग्य विभागाने सांगितले की, नुकताच कॅनडावरून परतलेल्या एका माणसामध्ये मंकीपॉक्स विषाणूची पुष्टी झाली आहे. सध्या, यूएस, यूके, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये मंकीपॉक्सच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे.

मंकीपॉक्स विषाणूचा उगम पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील देशांमध्ये झाला आहे. या भागातील लोक अनेकदा वन्य प्राण्यांच्या संपर्कात येतात. जनावरांच्या चाव्याव्दारे, ओरखडे किंवा वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार मानवामध्ये प्रवेश करतो. मंकीपॉक्स पूर्वी लैंगिक संक्रमित संसर्ग म्हणून स्पष्ट झाला नव्हता. परंतु आता त्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंकीपॉक्स असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून किंवा मंकीपॉक्स असलेल्या एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांच्या संपर्कातूनही हा आजार होऊ शकतो. (हेही वाचा: जगभरात वेगाने पसरत आहे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग; कारणे आणि लक्षणे जाणून घ्या)

दरम्यान, मंकीपॉक्स विषाणू संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांच्या संपर्कातून पसरतो. त्यामुळे संशयित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. मंकीपॉक्स विषाणूची लागण झाल्यानंतर, ताप, वेदना आणि थकवा यासह फ्लू सारखी लक्षणे दिसतात. यासोबतच, शरीरावर असामान्य लाल पुरळ उठू लागतात, ज्यामध्ये पू भरून नंतर त्यांचे फोड बनतात.