Male Fertility: पुरुषांना असं वाटतं की, जेव्हा मूल होतं तेव्हा त्यांच्या वयाचा काही फरक पडत नाही. परंतु, असं होत नाही. कारण, पुरुषांच्या वयाबरोबर शुक्राणूंची संख्या (Sperm Count) आणि गुणवत्ता कमी होते. जैविक दृष्टिकोनातून, पुरुषाचे वय 20-30 वर्षे वडील होण्यासाठी पुरेसे आहे. या वयात आरोग्य आणि वैद्यकीय स्थिती सामान्यतः चांगली असते. तथापि, पुरुषांना 50 किंवा त्याहून अधिक वय असताना मुलं होणं कठीण होतं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एक माणूस वयाच्या 92 व्या वर्षी बाप झाला. तरीही, संशोधकांच्या मते, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना यश मिळण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर वाढत्या वयात वडील बनल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात.
पुरुष शुक्राणूंची निर्मिती करणे कधीही थांबवत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांच्याकडे महिलांसारखे बॉयोलॉजिकल क्लॉक नाही. पुरुषाचे वय वाढत असताना, त्याच्या शुक्राणूमध्ये अनुवांशिक बदल होतात आणि त्याच्या शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान होऊ शकते. याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे होणाऱ्या बाळाला मेडीकल समस्या उद्भवू शकते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, वय जास्त असताना वडील बनल्याने मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटलची समस्या उद्धभवण्याची शक्यता जास्त असते. 2010 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या मुलांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर विकसित होण्याचा धोका सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे. (हेही वाचा - Benefits Of Mango: आंबा खाल्ल्याने होतात 'हे' 10 फायदे; फळांच्या राजाचे हे महत्त्वपूर्ण गुणधर्म तुमच्या आरोग्यासाठी ठरतील गुणकारी, वाचा सविस्तर)
शुक्राणूंच्या संख्येवर 'हे' घटक परिणाम करतात -
जीवनशैलीशी संबंधित अनेक घटक आहेत, जे तुमच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. यामध्ये खराब आहार, धूम्रपान, मद्यपान, औषधे घेणे आणि लठ्ठपणा यांचा समावेश होतो. धुम्रपानामुळे शुक्राणूंची गुणवत्ता तर कमी होतेच पण त्याच्या प्रमाणावरही परिणाम होतो.
शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढण्यासाठी 'हे' करा -
शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सकस आहार घ्यावा. तुमचे वजन जास्त असल्यास, काही किलो वजन कमी करावे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, शुक्राणूंच्या संख्येसाठी अँटिऑक्सिडंट्स समृद्ध आहार देखील मदत करू शकतो. तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी अल्कोहोल आणि धूम्रपानापासून दूर रहा.