Karwa Chauth 2018 :  करवा चौथचा उपवास या '5' लोकांनी करणं ठरू शकतं धोकादायक
करवा चौथ (File Image)

पुरूषप्रधान संस्कृती असणार्‍या आपल्या भारतामध्ये पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रिया करवा चौथ दिवशी उपवास करतात. यंदा करवा चौथ 27 ऑक्टोबर 2018 रोजी आहे. प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेश या उत्तर भारतामध्ये करवाचौथ हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. यादिवशी सुर्योदयापासुन चंद्रोदयापर्यंत विवाहीत स्त्रिया निर्जळी उपवास करतात.

रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चाळणीतून पतीचा चेहरा पाहिला जातो. त्यानंतर पती आपल्या हाताने पत्नीला पाणी आणि अन्नाचा एक घास भरवतो. आजकाल महिलांसोबत काही पुरूषही हा उपवास ठेवतात. करवाचौथ तुम्हांला सिनेमात पाहून रोमॅन्टिक वाटत असला तरीही दिवसभर उपाशी राहणं कठीण आहे. काही लोकांसाठी अशाप्रकारे काहीही न खाता राहणं धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच तुम्हांला काही विशिष्ट त्रास असल्यास करवाचौथच्या उपवासापासून दूर राहणंच फायद्याचं आहे.

आहारतज्ञांच्या मते कोणी करवाचौथचा उपवास करणं त्रासदायक ठरू शकतं ?

1. मधुमेही -

मधुमेहींना आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा रक्तातील साखरेच्या प्रमाणात अचानक चढ-उतार होण्याची शक्यता असते. हा त्रास अत्यंत धोकादायक आहे.

2. रक्तदाबाचा त्रास -

खूप वेळ उपाशी राहिल्याने रक्तदाबावरही परिणाम होतो. जर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही औषधं घेत असाल तर काळजी घ्या. हायपोटेन्शन म्हणजे रक्तदाब कमी होणं धोकादायक आहे.

3.लिव्हर किंवा किडनीचा त्रास -

दिवसभर अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब न पिता राहणं आरोग्याला त्रासदायक आहे. याचा किडनी आणि लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. विशिष्ट औषधं घेत असल्यास पित्ताचा त्रास बळावू शकतो.

4. मासिकपाळी -

मासिकपाळी चालू असल्यास करवाचौथचा उपवास टाळा. धार्मिक कारणांसाठी नव्हे तर आरोग्याच्यादृष्टीने हे त्रासदायक ठरू शकते. अति रक्तस्त्राव होत असल्यास तुम्हांला वेळेवर खाणं गरजेचं आहे. अन्यथा अस्वस्थ वाटणं, विकनेस जाणवतो.

5. ताप -

फणफणत्या तापामध्ये उपवास करणं टाळा. अशावेळेस शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी असते. त्यामुळे दिवसभर अन्न-पाण्याशिवाय राहणं टाळा.

तुम्हांला इतर काही त्रास असल्यास, प्रामुख्याने गरोदरपणाच्या काळात किंवा कामानिमित्त तुम्ही बाहेर असणार असाल तर विनाकारण दगदग टाळा. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करायचा की नाही ? हे ठरवा.