देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) शिरकाव केल्यानंतर जी पहिली गोष्ट लोकांच्या लक्षात आली ती म्हणजे, या विषाणू पासून वाचण्यासाठी स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. त्या दृष्टीने होणाऱ्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत ‘काढा’ (Kadha) या गोष्टीने फार महत्वाची भूमिका बजावली आहे. घरगुती काढ्यासोबतच बाजारात अनेक कंपन्यांनी आपले काढे शर्यतीमध्ये उतरवले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत वाचनात येत होते किंवा कानावर पडत होते की, जर दीर्घकाळापर्यंत काढ्याचे सेवन केले तर ते शरीरास इजा पोहोचवू शकते. विशेषत: यकृतावर (Liver) त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आता आयुष मंत्रालयाने (AYUSH Ministry) स्पष्ट केले आहे की, काढा पिण्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
मंत्रालयाने माहिती दिली आहे की, काढा पिण्यामुळे शरीर निरोगी राहते, त्यामुळे याचे आजन्म सेवन केले जाऊ शकते. जर एखादया व्यक्तीला यकृताच्या समस्या उद्भवल्या असतील तर, काढा तयार करताना कोणत्या गोष्टी किती प्रमाणात वापरल्या आहेत त्यावर ते अवलंबून आहे. काढा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्व वस्तू घरात अन्न शिजवताना वापरल्या जातात. साधारणत: भारतीय खाद्य पदार्थांमध्ये या मसाल्यांचा वापर बर्याच काळापासून केला जात आहे आणि यामुळे यकृताच्या नुकसानासंदर्भात अद्याप कोणतेही विश्वसनीय तथ्य समोर आले नाही.
आयुष मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी, काढा पिणे, हळद व दुध पिणे, तुळशीचा चहा, आले, मध, काळी मिरी आणि दालचिनी इत्यादींचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. पत्रकार परिषदेत आयुष मंत्रालयाचे सचिव, वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, दालचिनी, तुळस आणि काळी मिरीचा वापर काढा बावण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसन प्रणालीवर अनुकूल परिणाम होतो. (हेही वाचा: साथीच्या रोगाचा थकवा म्हणजे काय? कोरोना विषाणूचे भावनिक प्रभाव नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या)
तसेच, दिवसातून दोनदा हा काढा घेण्यास सांगितले गेले आहे जेणेकरून आपले शरीर निरोगी राहील आणि आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने ही पद्धत लक्षात घेऊन काढा घेतला तर त्याला यकृताचा त्रास होऊ शकत नाही.