International Tea Day 2020 (Photo Credits: Pixabay)

International Tea Day 2020: चहा हे भारतातील एक लोकप्रिय पेय. 'आमच्याकडे चहाला या,' 'चहातरी घेऊन जा' ही वाक्य आपल्या संस्कृतीचा भाग झाली आहेत. चहाप्रेमींची आपल्याकडे कमी नाही. अनेकांना तर सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. चहाची तल्लफ अनावर होणारीही अनेक माणसे आपण पाहिली असतील. ऑफिसमध्येही टी-ब्रेक इज मस्ट. तर टपरीवरच्या वाफाळत्या चहाची मजा काही औरच असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चहाचे एक विशिष्ट स्थान आहे. त्यामुळे Tea Day सेलिब्रेट केला जातो. नॅशनल टी डे (Tea Day) दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्यानंतर महिनाभरानंतरच इंटरनॅशनल टी डे (International Tea Day) साजरा केला जातो. आज 21 मे रोजी इंटरनॅशनल टी डे साजरा होत आहे. हा टी डे भारत (India), श्रीलंका (Sri Lanka) यांसारख्या चहाप्रेमी देशांमध्ये 2005 पासून साजरा केला जात आहे.  त्यानंतर डिसेंबर 2019 पासून अमेरिकेतही Tea Day सेलिब्रेशनला सुरुवात झाली. त्यानंतर डिसेंबरमधील सेलिब्रेशन 21 मे रोजी करायला सुरुवात व्हायला लागली.

चहाची निर्मिती:

चहाचा शोध कधी, केव्हा लागला याची खात्रीशील माहिती देणे तसे अवघड आहे. परंतु, शांग राजवंश काळात युन्नान प्रदेशात (1,600 BC-1,046 BC) मध्ये औषधी पेय म्हणून याची निर्मिती करण्यात आली. 17 व्या शतकात ब्रिटनमध्ये चहा अत्यंत लोकप्रिय झाला. त्यानंतर चीनी मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी भारतात चहाचे उत्पादन करण्यास सुरुवात झाली.

उत्तम चहा कसा बनवाल?

चहा बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तरी देखील उत्तम चहा बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया...

भांड्यात पाणी घेऊन गॅसवर ठेवा. ते अधिक उकळवू नका. ते कपात किंवा टी मग मध्ये काढून त्यात चहाची पाने किंवा टी बॅग टीप करुन तुम्ही चहाचा आस्वाद घेऊ शकता.

तसंच भांड्यात पाणी घेऊन त्यात साखर, चहा पावडर, आलं, वेलची किंवा गवती चहा घालून उकळवा. त्यानंतर दूध घालून पुन्हा एक उकळ येऊ द्या आणि मग झक्कास चहाचा आस्वाद घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चहामध्ये लिंबू, दालचिनी, ओवा असे पदार्थही घालू शकता. पाणी, चहा, साखर यांचे प्रमाण ठरवल्याने चहा उत्तम होतो.

चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. अनेकांना अमृततुल्य वाटत असणाऱ्या या चहाला नाक मुरडणारे देखील आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच मात्र 'रिफ्रेशिंग पेय' म्हणून चहाचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही.