मधुमेहींसाठी खास दिलासादायक बातमी आहे. इन्सुलिनची निर्मिती करणारे कृत्रिम स्वादुपिंड (Artificial Pancreas) तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. या कृत्रिम स्वादुपिंडाचे प्रत्यारोपणही शक्य असल्याची माहिती भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) संशोधक जयेश बेल्लारे यांनी दिली.
रक्तातील साखरेच्या अधिक प्रमाणामुळे मधुमेह होतो. याचाच अर्थ मधुमेहींच्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक असते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील कार्बोहाड्रेड्सचे विघटन होणे आवश्यक असते. त्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची गरज भासते. या हार्मोनची निर्मिती स्वादुपिंडाद्वारे केली जाते. मात्र मधुमेहींचे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे मधुमेहींना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. अनेकदा गंभीर परिस्थितीत स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करावे लागते. मात्र अनेकदा कृत्रिम स्वादुपिंड शरीराकडून स्वीकारले जात नाही.
मधुमेहींच्या या त्रासावर आयआयटीतील संशोधकांनी उत्तर शोधले आहे. पॉलिमरच्या तंतूचे पोकळ पटल वापरुन संशोधकांनी जैवकृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती केली आहे. हे स्वादुपिंड शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वीकारते आणि इन्सुलिनची निर्मिती होते. सध्या प्राथमिक पातळीवर या स्वादुपिंडाचे कार्य सुरु असून शरीरातील प्रत्यक्ष वापरासाठी अजून थोडा कालावधी लागणार आहे.
कशी केली जैव कृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती?
बाळाच्या नाळेतून घेतलेल्या मानवी स्टेम पेशी आणि डुकराच्या स्वादुपिंडातून घेतलेल्या आयलेट पेशी वापरून संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंडाची चाचणी केली. याची चाचणी उंदरावर करण्यात आली. मात्र स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा कोणताही त्रास उंदरांच्या इतर अवयवांना झाला नाही, असे प्रयोगातून दिसून आले. पुढील संशोधनासाठी फार्मास्युटीकल कंपन्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.