COVID-19 पीडितांनो अधिक श्रम टाळा, तब्बेतीकडे लक्ष द्या; ICMR द्वारा सावधगिरीचा इशारा
Representative Image (Photo Credits: RawPixel)

ICMR Study News: हृदयविकाराचा झटका (Heart Attac) आल्याने अचानक होणाऱ्या विविध वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. नवरात्रोत्सव काळात तर गरबा खेळताना झालेल्या मृतांची संख्या लक्षवेधी ठरली. या पार्श्वभूमीवर समाजातून चिंता व्यक्त होत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) द्वारे केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष सामायिक केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ज्यांनी यापूर्वी कोविड-19 च्या गंभीर संसर्गाशी लढा दिला त्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण काहीसे अधिक आहे. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी अशा नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

ICMR अभ्यासाचे निष्कर्ष: आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केलेल्या सर्वसमावेशक अभ्यासाच्या निष्कर्षांवर प्रकाश टाकला. या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींना यापूर्वी गंभीर कोविड-19 संसर्गाचा अनुभव आला आहे, त्यांना जास्त परिश्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी त्यांनी एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी अधिकचा व्यायाम, धावणे किंवा कठोर व्यायाम करणे टाळावे, असेही म्हटले.

हृदयाशी संबंधित मृत्यूचे बळी: अनेक व्यक्तींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ज्यात खेडा जिल्ह्यातील 12 वीचा विद्यार्थी वीर शाह, अहमदाबाद येथील 28 वर्षीय रवी पांचाल आणि वडोदरा येथील 55 वर्षीय शंकर राणा यांचा समावेश आहे. इतरही अनेक ठिकाणी अशाच घटना घडल्या आहेत.

हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू: गुजरातमध्ये हृदयाच्या समस्यांशी संबंधित अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे. विशेषत: नवरात्रोत्सवादरम्यान, 'गरबा' कार्यक्रमांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. या घटनांमुळे राज्याचे आरोग्य मंत्री, रुषिकेश पटेल यांना कारणे तपासण्यासाठी आणि संभाव्य उपाय शोधण्यासाठी हृदयरोग तज्ञांसह वैद्यकीय तज्ञांची बैठक बोलावली होती.

सावधगिरीचे उपाय: संभाव्य आरोग्य धोक्यांना संबोधित करण्यासाठी (विशेषत: सणासुदीच्या काळात) गुजरात राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, गरबा इव्हेंट आयोजकांनी सहभागींना त्वरित मदत देण्यासाठी साइटवर एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक मेळावे आणि उत्सवादरम्यान सुरक्षितता वाढवणे हा या उपायाचा उद्देश आहे.

व्हिडिओ

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातला नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हृदयाशी संबंधित मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली. गुजरात सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाने सावधगिरीचा उपाय म्हणून एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात (विशेषत: गरबा) इव्हेंट आयोजकांनी सहभागींना त्वरित मदत देण्यासाठी साइटवर एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक मेळावे आणि उत्सवादरम्यान सुरक्षितता वाढवणे हा या उपायाचा उद्देश आहे.