विमान प्रवास हा वेळेची बचत करणारा असला तरीही तो प्रत्येकवेळेस आरामदायी असेलच असे नाही. अनेकदा लांबपल्ल्याचा विमान प्रवास नकोसा वाटतो. त्यामधून अनेक दुखणी वाढतात. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने विमानप्रवास करताना काही गोष्टींबाबत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या : प्रवाशांच्या कान-नाकातून रक्त; जेट एअरवेज विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
पहिल्यांदा विमान प्रवास करताना तुमच्याही मनात काही भीती असेल किंवा लांब पल्ल्याचा विमानप्रवास तुम्हांला थकवणारा असेल या काही गोष्टींची काळजी घ्या म्हणजे तुमचा प्रवास नक्कीच आनंददायी होईल...
लांब पल्ल्याचा विमानप्रवास आरोग्याला त्रासदायक ?
1. डीप व्हेन थ्रोमबोसीस ( Deep Vein Thrombosis)
डीप व्हेन थ्रोमबोसीस म्हणजे प्रामुख्याने पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या. क्लॉट्स निर्माण होतात. ही गुठळी फूटल्यास शरीरात हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. लांब पल्ल्याच्या विमानप्रवासात फार काळ हालचाल न केल्यास हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास असलेल्यांना या त्रासाचा धोका अधिक असतो.
काय काळजी घ्याल ?
व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास असलेल्यांनी विमानप्रवासात अति घट्ट कपडे घालणं टाळा. पाय बसल्या जागी फिरवत रहा, पोटर्यांच्या भागाला ठराविक वेळाने हलका मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो.
2. रक्तदब वाढण्याची भीती
तुम्ही जितक्या उंचीवर असता तितका शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. सामान्य किंवा कमी रक्तदाबाच्या लोकांपेक्षा विमानात रक्तदाब वाढण्याचा धोका हाय ब्लड प्रेशरच्या लोकांना अधिक असतो. रक्तदाब वाढल्याने हृद्यविकाराचा धोका बळावू शकतो.
काय कराल ?
ठराविक वेळाने विमानात चाला. प्रवासादरम्यान खारट पदार्थ टाळा. तुमच्या सोबत असणार्या बॅगेमध्ये तुमची उच्च रक्तदाबाची औषधं ठेवा. औषधांच्या वेळा चुकवू नका.
3. कानाचं दुखणं
विमानप्रवासात तुम्ही जसे वर वर जाता तसा अॅल्टिट्युडमध्ये बदल झाल्यास कानामधील प्रेशर वाढते. कानामध्ये या दाबात फरक झाल्यास दुखणं वाढतं. विमानप्रवासात काही वेळ कानाला दडे बसतात.
काय कराल ?
कानामध्ये दडे बसतात असे वाटत असल्यास हा दाब नियंत्रित करण्यासाठी च्युईंग गम चघळा. जांभई द्या किंवा पाणी प्या. यामुळे कानाला होणारा त्रास आटोक्यात राहतो.
4. डीहायड्रेशन
विमानात ह्युमिडीटी कमी असल्याने शुष्कपणा वाढतो. त्वचा, डोळे आणि घसा यांच्यावरही विमानप्रवासात परिणाम होतो.
काय कराल ?
विमानप्रवासात डीहायड्रेशनचा त्रास टाळायचा असेल तर मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. डीहायड्रेशनपासून दूर रहायचे असेल तर अल्कोहल, कॉफी, चहा यांचं अतिसेवन टाळणंच हितकारी आहे.
5. जेट लेग
लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये टाईम झोनमध्ये बदल झाल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतो. तुम्हांला जेट लॅग जाणवू शकतो. प्रामुख्याने टाईम झोन बदलला की झोपेचं चक्र बिघडतं. यामधून बद्धकोष्ठता, डायरिया, मळमळ, अस्वस्थता जाणवते.
काय कराल ?
टाईम झोन बदलल्यानंतर तुमचं झोपेचं चक्र कसे बदलणार याकडे वेळीच लक्ष द्य. त्यानुसार विमानाचं तिकीट बुक करा. जेट लॅग टाळायचा असेल तर प्रवासापूर्वी पुरेसा आराम करा.
सतत विमानप्रवास करणं कालांतराने आरोग्याला धोकादायक असते. यामधून कॅन्सर जडण्याचा धोका असल्याचंही संशोधकांनी म्हटले आहे.